आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तेथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष देशमुख यांचे चिरंजीव व प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी रोहन देशमुख निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. भाजपने उस्मानाबादेतील शिवसेना आमदारांसमोरील ही अडचण दूर करावी, अन्यथा सोलापुरात अडचण निर्माण करू, असा इशारा शिवसेनेने दिल्याने ‘महायुती’त खळबळ उडाली आहे.
सोलापुरातून अँड. शरद बनसोडे यांची उमदेवारी भाजपने जाहीर केली आहे, तर उस्मानाबदमधून शिवसेनेने प्रा. रवी गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार वैयक्तिक पातळीवर कामाला लागले असले तरी ‘महायुती’ म्हणून ते अजूनही मतदारांच्या समोरे जाताना दिसत नाहीत. उस्माबादेतून रोहन देशमुख हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. भाजपने उमेदवारी दिली नाही तर आपण अपक्ष लढू, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे उस्माबादेत शिवसेनेसमोरच नव्हे तर महायुतीसमोर अडचण निर्माण झाली आहे.
नागपूरपाठोपाठ सोलापुरातही आता त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. सोलापुरात शिवसेनेने उस्मानाबादचा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तेथे रवी गायकवाड यांचे भाजपला पाठबळ मिळत नाही तोवर सोलापुरात भाजप उमेदवारांसाठी प्रचारात उतरायचे नाही असा निर्णय घेतल्याने त्यात भरच पडली आहे. अँड. बनसोडे या राजकीय डावपेचामुळे अडचणीत आले आहेत.
भाजपची स्वतंत्र बैठक
भारतीय जनता पक्षाने बुधवारी एका हॉटेलमध्ये शहरातील नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला फक्त भारतीय जनता पक्षाचेच नगरसेवक उपस्थित होते. महायुतीतच तेढ निर्माण झाल्याने शिवसेनेच्या नगरसेकांना बैठकीला बोलावलेच नसल्याचे कळाले.
सेनेचा संशय गडकरींवर
रोहन देशमुख यांच्या उमेदवारीचा परिणाम गायकवाड यांच्यावर होणार आहे. सुभाष देशमुख हे भाजपचे नेते नितीन गडकरी गटाचे असल्याने त्यांनी शिवसेनेच्या विरोधात खेळी केली असावी, अशी धारणा शिवसेनेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सहा हजार मतांनी पराभव झालेले प्रा. गायकवाड यांना संधी असताना देशमुखांमुळे पराभव होऊ नये म्हणून शिवसेनेने भाजपची कोंडी निर्माण केली.
देशमुखांचा प्रश्न भाजपने सोडवावा
महायुतीचे उमेदवार अँड. शरद बनसोडे यांना आमचा विरोध नाही. आम्ही स्वतंत्र प्रचार करत आहोत. मात्र, उस्मानाबादेत भाजपचा उमेदवार बंडखोरी करणार असेल तर ते भाजपने रोखणे गरजेचे आहे. अन्यथा सोलापुरात आम्ही तटस्थ राहू शकतो. हा प्रश्न भाजपनेच सोडवायचा आहे. - पुरुषोत्तम बरडे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.