आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय जनता पक्षामध्ये बेदिली, शिस्तीचा बोजवारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर प्रचंड उत्साहात असलेल्या भारतीय जनता पक्षातील चित्र सध्या बेशिस्त झाल्याचे दिसते आहे. आमदार विजय देशमुखांवर थेट हल्लाबोल करून नगरसेवक सुरेश पाटील यांनी घरचा आहेर दिला आहे. एकीकडे पक्षात बेदिली माजलेली असताना वरिष्ठांनी या प्रकाराकडे कानाडोळा केला आहे.
येणार्‍या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून भाजपचे उमेदवार आमदार विजय देशमुख हेच असतील असे जवळपास स्पष्ट असतानाही नगरसेवक सुरेश पाटील यांनी पहिल्यांदा काँग्रेसचे मनपातील सभागृहनेते महेश कोठे यांना भाजपत येण्याचे जाहीर निमंत्रण देऊन टाकले. एवढय़ावरच न थांबता विधानसभेची उमेदवारी देऊ असे सांगून कहर केला. त्यानंतरही पाटलांनी विजय देशमुखांच्या कार्यशैलीवर टीकाटिपण्णी केली. पक्षातील ही आमदार-नगरसेवकांतील जुगलबंदी पक्षातील अन्य नेत्यांनी काहीही न बोलता एन्जॉय केल्याची चर्चा आहे.
या एकूणच वातावरणाचे पडसाद येणार्‍या विधानसभा निवडणुकीत उमटतील असे दिसू लागले आहे. शहर उत्तरमध्ये आजवर एकत्र राहिलेले देशमुख व पाटील विरोधात उभे ठाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. देशमुख आणि सुरेश पाटील यांच्यातील मैत्री सर्वर्शुत आहेच. पण त्यात या वादाने आणखी भर पडली आहे. काँग्रेसमधील नाराजीचे पडसाद भाजपमध्ये उमटू लागले आहेत.
पक्षाकडून दखल नाही
सध्या महापालिकेत सादर होणार्‍या अंदाजपत्रकीय सभेत भूमिका ठरवण्यासाठीचा विषय आमच्या अजेंड्यावर आहे. त्या गडबडीत असल्याने सुरेश पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत अद्याप शहराध्यक्ष विजय देशमुख यांच्याबरोबर चर्चा झालेली नाही. पक्ष पातळीवर याची अजून दखल घेतलेली नाही. सुरेश पाटील हे तर माझे जवळचे मित्रच आहेत. ते माझ्यावर कशाला आरोप करतील?. सुरेश पाटील तसे वागणार नाहीत असे वाटते. पक्षातील गैरसमज लवकरच दूर होतील. ’’अशोक निंबर्गी, सरचिटणीस, भाजप शहर
भाजपचा महापौर होऊ शकतो
शिवसेना जिल्ह्यात काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. मग आम्ही शहरात का करू नये?, नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत अनेकांना सोबत घेतले. आम्हीही तसाच प्रयत्न करीत आहोत. महेश कोठे भाजपमध्ये आले तर महापालिकेत भाजपची सत्ता येऊ शकते, भाजपचा महापौर होऊ शकतो. असा माझा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार व शहराध्यक्ष विजय देशमुख हे बनसोडे ऐवजी सुरेश कोरे यांना तिकीट द्या असे म्हणत होते, ते काँग्रेससाठी सोपे झाले असते त्यामुळे देशमुखांचा हेतू काय होता?’’ सुरेश पाटील, नगरसेवक, भाजप
विजय देशमुखांचे मौन
भाजपमध्ये आल्यास महेश कोठे यांना शहर उत्तरमध्ये उमेदवारी दिली जाईल, असे जाहीर पत्रक काढणार्‍या नगरसेवक सुरेश पाटील यांच्या भूमिकेवर आमदार व शहर भाजपचे अध्यक्ष विजय देशमुख यांनी मौन पाळले आहे. त्यांच्याशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. पक्षातील अन्य स्थानिक नेतेही काही बोलण्यास तयार नाहीत.