आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वरांच्या नयनांनी ‘जीवनगाणे’; लवकरच करणार व्यावसायिक प्रयोग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कोणतेही रंग आणि निसर्ग डोळ्यात साठवू न शकलेले दृष्टीहीन संगीतप्रेमी एकत्र आले. व्यंगाचे भांडवल करत रडत न बसता त्यांनी आपल्या संगीतकलेच्या बळावर संगीत व्यावसायिक संघ तयार करून त्याद्वारे जीवनगाणे रडत रडत नव्हे तर हसत हसत गावे असा संदेश दिला. विविध क्षेत्रात काम करणार्‍या मित्र-मैत्रिणींनी संगीतावरील प्रेमापोटी पै पै जोडून बनवलेली ‘स्वरनयन’ संस्था लवकरच आपल्यासमोर व्यावसायिक प्रयोगांसह पुढे येत आहे.

शहरातील विविध भागांत राहणारे हे समविचारी मित्रमैत्रिणी रोज तालमीसाठी जमतात आणि संगीताची आराधना करतात. या कलावंतांच्या संस्थेमध्ये काही जण सुशिक्षित बेकार आहेत. त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या संगीत छंदातून काही अर्थाजन होते का, हे चाचपण्यासाठी ‘स्वरनयन’ची स्थापना पिराजी सुरवसे व संजय चलवादी यांनी केली आहे. असे करून त्यांनी संगीताविषयी प्रेमही जोपासले आहे आणि रसिकांचे मनोरंजन तसेच अर्थाजन हे हेतूही साध्य करता येऊ लागले. या संघाचे व्यावसायिक प्रयोग सुरू झाले, ज्याने त्यांना जगण्याचा एक उत्तम दुवा मिळालाय.

"आम्ही कलेचे उपासक आहोत. रसिकांनी प्रोत्साहित करावे. शहरात लवकरच आम्ही प्रयोग सुरू करत आहोत. व्यंगाने रडत बसण्यापेक्षा कलेचा आधार घेतला तर जीवन जगणे सोपे होते."
-संजय चलवादी, निर्माता

"जगण्यासाठी संगीत हे उत्तम औषध आहे. ते घेऊन जगण्याचे बळ मिळवण्याचा प्रयास आहे. संगीत हे सर्व व्यंगांना आधार देणारे माध्यम आहे. नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहोत."
-पिराजी सुरवसे, सूत्रधार

अशी सुचली संकल्पना
हे सगळे मित्र अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात गायन व वादनाचे काम करतात. काही काळानंतर त्यांच्या लक्षात आले की हक्काचे व्यासपीठ मिळत नाही. आपले हक्काचे व्यासपीठ तयार करावे व त्यातून संगीत आराधना करावी, या तळमळीतून जन्माला आले संगीताचे व्यावसायिक प्रयोग करणारे ‘स्वरनयन’.

असा जमला संगीतप्रेमींचा मेळा
पिराजी सुरवसे, विलास बनसोडे, संजय चलवादी, राजू राऊत, प्रभाकर कदम, अनिल शिंदे, र्शध्दा लंगोटे, मंगल कोळेकर, मंगल काळेगीरी या दहा कलावंतांचा स्वरनयन संघ. संजय चलवादी या कलावंताने वाद्याची जमवाजमव केली, तर सूत्रधार व साहाय्यक निर्माता म्हणून पिराजी सुरवसे पुढे आले. निवेदन : अनिल शिंदे, तबला : पिराजी गायकवाड, राजू राऊत साइड रिदमवर साथ देतात. कार्यक्रमांना फुलवण्याचे काम मंगला कोळेकर, मंगला काळेगिरी व र्शध्दा लंगोटे हे स्त्री गायक करताहेत.