आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक वैगुण्यावर मात करून साधली स्वयंसिद्धी!, अंधांनी उभारला ऑर्केस्ट्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्मत:च वैगुण्य पदरी पडलेले असले तरी जिद्दीच्या बळावर त्यावर मात करून स्वत:ला सिद्ध करता येऊ शकते, याचा वस्तुपाठच सांगली जिल्ह्यातील अंध मुलांनी घालून दिला आहे. या मुलांनी उपजत कलागुणांना पैलू पाडून नैसर्गिक वैगुण्यावर मात केली आणि ‘स्वरगंधा’ऑर्केस्ट्रा उभा केला. हा ऑर्केस्ट्रा आजघडीला कौतुकाचा विषय ठरला आहे.

मिरजेतील नॅबच्या अंध महाविद्यालयात शिकत असलेले सालम नदाफ, अर्जुन वाघमोडे, मकरंद पारवे, कोल्हापूरच्या अंध शाळेतील प्रणव बेलेकर आणि पुण्याचा प्रवीण पाखरे या मुलांमधील संगीताची उपजत जाण हेरली त्यांचे शिक्षक महेश नवाळे यांनी. त्यांनी या मुलांतील उपजत गुण फुलवण्यासाठी त्यांना संगीताकडे खेचले. स्वत: नवाळे हे उत्तम तबलावादक आहेत. त्यांनी या मुलांना गायन, वादनातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आग्रह धरला. अर्थातच त्यासाठी अाधी या पाचही मुलांच्या पालकांची भेट घेऊन मुलांमधील कला त्यांच्या उपजीविकेचे साधन होऊ शकते हे पटवून दिले. या प्रयत्नांतूनच या मुलांनी स्वरगंधा ऑर्केस्ट्रा उभा केला. सध्या बीएच्या पहिल्या वर्षात शिकत असलेले हे पाचही विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाची संगीताची पदविका घेत आहेत.
परिपक्व गायकी
गाणे परिपक्व असेल तरच रसिक ऐकतात. मग ते कोण गातो, हे महत्त्वाचे नसते. या मुलांनाही आपण अंध आहोत म्हणून कसेही गायलो तरी सहानुभूती म्हणून लोकांनी ते ऐकावे, असे वाटत नाही. म्हणूनच त्यांनी मेहनतीने आपले गाणे परिपक्व केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमालाही मागणी वाढते आहे.

अंध असूनही डोळस सादरीकरण
सालम हा सिंथेसायझर व प्रणय हार्मोनियम वाजवताे. प्रवीण पॅडवादक आहे. अर्जुन हा ढोलकी वाजवण्यात पारंगत आहे. तर अंध व मतिमंद असूनही मकरंदला निसर्गाने अतिशय गोड गळा दिला आहे.

स्वावलंबी मार्ग
‘अंध मुलांना बहुतेकदा नोकरी मिळत नाही. प्रत्येकाला व्यवसाय करणेही शक्य होत नाही. म्हणून उपजत कलेचा त्यांच्या करिअरसाठी वापर केला तर या मुलांचा पालकांवरही आयुष्यभराचा भार होणार नाही, असे हा ऑर्केस्ट्रॉ तयार करणारे महेश नवाळे म्हणाले.