सोलापूर - रक्तदानाची चळवळ ग्रामीण भागात रूजली आहे, मात्र शहरात रक्तदान चळवळीला आणखी गती येण्यासाठी जनजागृतीची गरज आहे, असे प्रतिपादन बालाजी अमाइन्सचे चेअरमन राम रेड्डी यांनी केले.
शिवस्मारक येथे ‘एनएबीएच’कडून अँक्रिडिटेशन मानांकन मिळालेल्या हेडगेवार रक्तपेढीच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदात्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राम रेड्डी बोलत होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साताळकर, जिल्हा संघचालक दामोदर दरगड, अध्यक्ष डॉ. भारत मुळे, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव रमेश विश्वरूपे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रेड्डी म्हणाले, ‘रक्तदात्यांचा अशा प्रकारे कृतज्ञता सोहळा केल्याने प्रोत्साहन मिळते. सामाजिक गरजेच्या माध्यमातून हेडगेवार रक्तपेढी काम करत आहे. रक्तदानाविषयी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात प्रमाण कमी आहे. भारताची लोकसंख्या कोट्यवधी आहे. मात्र, रक्तदात्यांची संख्या मात्र 100 ते 1000 च्या प्रमाणात आहे. त्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.’ डॉ. सुनील वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोक मनगोळी यांनी आभार मानले.
87 संस्थांचा सत्कार
सोलापुरातील रक्तदानाला प्रोत्साहन देण्यार्या 87 संस्थांचा या वेळी सत्कार करण्यात आला. 50 पेक्षा जास्त पिशव्या रक्तसंकलन करणार्या 60 संस्था, 100 पेक्षा जास्त पिशव्या रक्तसंकलन करणार्या 15 आणि शिक्षक, उद्योग आणि इतर विभागानुसार रक्तसंकलन करणार्या 12 संस्थांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.