आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा नदीत होडी बुडाली; 1 मृत्युमुखी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - आंबेचिंचोलीहून (ता. पंढरपूर) सरकोलीकडे निघालेली एक होडी गुरुवारी भीमा नदीत बुडाली. या दुर्घटनेत एका वृद्धाचा मृत्यू झाला. पांडुरंग मारुती कदम (वय 70, रा. आंबेचिंचोली, ता. पंढरपूर) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी सात वाजता ही दुर्घटना घडली. होडीला छिद्र होते. त्यात चिंधी कोंबलेली होती. ती निघाली आणि ही दुर्घटना घडली.

सरकोलीचे 15 जण कुसूम नामदेव भोसले यांच्या तिसर्‍या दिवसाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. होडी बुडू लागताच पोहता येणारे तिघे सुखरूप बाहेर निघाले. होडीचालक संजय केरप्पा गालफाडे (रा. सरकोली, ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जीवन लक्ष्मण पाटील, सिद्धेश्वर लक्ष्मण पाटील, शरद शामराव पाटील, दत्तात्रय ज्ञानोबा कदम , दिगंबर कोकाटे, लक्ष्मण प्रल्हाद कदम, बाळासाहेब प्रल्हाद कदम, सुधाकर भाऊसाहेब जाधव, नागेश स्वामी, नंदकुमार भारत आतकरे, पांडुरंग मारुती कदम यांच्यासह अन्य चारजण होडीतून निघाले होते. सरकोली पाणवठय़ापासून सुमारे शंभर फूट अंतरावर असताना होडीच्या छिद्रातील चिंधी निघाली. पाणी वेगाने आत घुसले. नंदकुमार आतकरे, लक्ष्मण कदम आणि सिद्धेश्वर कदम यांना चांगले पोहता येत होते. त्यांना इतरांनी मदत करून बाहेर काढले. मात्र, पांडुरंग कदम बेपत्ता झाले. सरकोली, आंबेचिंचोलीच्या गावकर्‍यांना शोधकार्य करताना दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर आंबेचिंचोलीत रात्री मृतावर अंत्यसंस्कार झाले. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम, तहसीलदार सचिन डोंगरे, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची निष्क्रियता स्पष्ट दिली. मृतदेह शोधण्यासाठी इंजिनाची बोट आणि पोहणार्‍यांचाही पत्ता नव्हता.