आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धगया येथील बॉम्बस्फोटाचे पडसाद सोलापुरात; शहरात दोन ठिकाणी दगडफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बुद्धगया येथील बॉम्बस्फोटाचे पडसाद रविवारी सोलापुरात उमटले. सायंकाळी पाचच्या सुमाराला कुमठा नाका परिसर, माधवनगर, हुडको कॉलनी, सत्तर फूट चौक, लक्ष्मीनारायण टॉकीज परिसरात दगडफेक झाली. त्यात दुकानांचे, वाहनांचे नुकसान झाले.

पोलिस आल्यानंतर स्थिती नियंत्रणाखाली आली. वातावरण शांत पण, तणावपूर्ण होते. दरम्यान, एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत अन्य काहींची धरपकड सुरू होती.

सायंकाळी तरुणांचा गट अचानक रस्त्यावर येत दुकाने बंद करण्याचे आवाहन करू लागला. काही कळण्याच्या आतच दगडफेक सुरू झाली. एलजे बेंगलोर बेकरी, श्रीनिवास बुक डेपो, रवी ट्रेडर्स या दुकानांची तोडफोड केली. काही वाहनांची मोडतोड करण्यात आली. दुकाने बंद करत असताना तोडफोड केल्याची माहिती दुकानदारांनी दिली.

माधवनगरातील वनिता कनकुंटला यांच्या चहा कॅन्टीनची मोडतोड झाली. यात त्या जखमी झाल्या. दरम्यान, या भागात गस्त व पथक वाढविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले. पसिरसात जादा कुमक आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल दबडे यांनी दिली.

अफवांवर विश्वास नको
बंदोबस्त वाढविला आहे. बीट मार्शल, पोलिस निरीक्षक, साहाय्यक आयुक्त, उपायुक्त या दर्जाचे अधिकारी गस्त देत आहेत. नागरिकांनीही शांतता बाळगावी, अफवांवर विश्वास ठेवू नये.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त

आज शहरात मूक मोर्चा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी पाचच्या सुमाराला बैठक झाली. सोमवारी सकाळी साडेदहाला मूकमोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यू बुधवारपेठ, उद्यान येथून शिवाजी चौक,चार पुतळा या मार्गावरून मोर्चा निघणार आहे.