सोलापूर - वांगी रस्त्यालगतच्या भूषण नगरातील पुरुषोत्तम आयुर्वेदिक रुग्णालयाचे डॉ. बाप्पा चित्तरंजन बिस्वास (वय २४, रा. साई होम, नवीन आरटीओ कार्यालयजवळ) यांना सलगर वस्ती पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे डॉक्टर व्यवसाय करण्याची परवानगी नसताना ते हा व्यवसाय करत होते. ही कारवाई मंगळवारी दुपारी बाराला झाली.
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंती आडके यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. बिस्वास मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. दोन वर्षांपासून ते सोलापुरातील भूषण नगरात दवाखाना चालवत होते. त्यांनी नॅचरोपॅथी पदवी पूर्ण केली आहे. या पदवीला डॉक्टर व्यवसाय करता येत नाही. शिवानंद पुजारी (रा. वांगी) या तरुणाच्या नातेवाइकांनी डॉक्टरबद्दल पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर डॉ. आडके यांना पोलिसांनी घटनेची माहिती दिल्यानंतर डॉक्टरची कागदपत्रे तपासण्यात आली. होमोओपॅथी, अलोपॅथी किंवा आयुर्वेदिक अशा तीनपैकी एका विभागाची पदवी त्यांच्याकडे सापडली नाही. नॅचरोपॅथीची पदवी आढळून आली. त्यावर प्रॅक्टिस करता येत नाही.