आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bogus PH.d Issue At Solapur Three Professor On Action

बोगस पीएच.डी.प्रकरण: तीन प्राध्यापकांवर झाली बडतर्फीची कारवाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मेघालयाच्या शिलॉंग येथील सीएमजे खासगी विद्यापीठातून पीएच. डी. पदवी प्राप्त जिल्ह्यातील सात प्राध्यापकांपैकी तिघांना मंगळवारी त्या-त्या संस्थेनी बडतर्फ केलेले आहे. यामध्ये प्रा. सुभाष मस्के, प्रा. व्यंकटेश कुलकर्णी, प्रा. बी. एस. कौलगी यांचा समावेश आहे.

मंगळवारी शेळवे येथील कर्मवीर अभियांत्रिकीतील प्रा. सुभाष मस्के यांना बडतर्फ करण्यात आले. बोगस पीएच.डी. पदवी घेणार्‍यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत प्राचार्य एस. पी. पाटील म्हणाले, ते गेल्या अनेक दिवसांपासून महाविद्यायलात येत नव्हते. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. सोलापुरातील ए. जी. पाटील अभियांत्रिकीचे प्रा. बी. एस. कौलगी यांना आज कार्यमुक्त करण्यात आले, असे प्राचार्य एस. ए. पाटील यांनी सांगितले.

वैराग येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील प्रा. व्यंकटेश कुलकर्णी यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. प्राचार्य व्ही. के. ढेंगळे - पाटील म्हणाले, सीएमजे विद्यापीठाचे नावही आम्हाला माहीत नव्हते. प्रा. कुलकर्णी यांनी जे केले ते वैयक्तिक पातळीवर असेल. संस्थेचा काही संबंध नाही. विद्यापीठालाही आम्ही तसेच कळविले होते. त्यांना आज बडतर्फ केले.

पुढील कारवाईकडे लक्ष
सीएमजे या खासगी विद्यापीठाकडून बोगस पीएच.डी. पदवी मिळवलेल्या सातपैकी चार प्राध्यापकांना कारवाईला सामोरे जावे लागले. व्हीव्हीपीतील प्रा. एस. एस. कात्रे यांनी कालच राजीनामा दिलेला आहे. के. एन. भिसे महाविद्यालयातील प्रा. नामदेव गरड हे 31 मे रोजी निवृत्त झाले आहेत. हिराचंद नेमचंदचे प्रा. सत्यजित शहा आणि भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकीचे प्रा. व्यंकटेश गड्डिमे यांनी सीएमजेची पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

महाविद्यालये अडचणीत
हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय आणि शेळवे अभियांत्रिकी महाविद्यालयाने पीएच.डी. पदवी प्राप्त प्राध्यापकांची माहिती विद्यापीठापासून दडवून ठेवली होती. प्राध्यापकांनी पीएच.डी. प्राप्त केल्याचे वृत्त त्या त्या वेळी प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे प्रार्चायांनीही पदवी मिळाल्याबद्दल सत्कार केल्याचे दिसून येत आहे. तशी छायाचित्रे झळकली आहेत. तरीही माहिती नसल्याचे लेखी कळविल्याने हे प्रकरण चांगलेच तापणार आहे.