आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांना अल्पशिक्षित पशुवैद्यकाची बाधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- डेअरी उद्योगात काम करणार्‍या अकुशल कामगारांचे कौशल्य वाढवण्यासाठी डेअरी डिप्लोमा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या काहींनी थेट जनावरांचे डॉक्टर असल्याच्या थाटात डॉक्टरीपेशा सुरू केला आहे. प्रशिक्षण न घेताच स्वयंघोषित वैद्यकांनी जनावरांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. शहर व जिल्ह्यात अशा प्रकाराच्या वैद्यकांची संख्या 250 पेक्षा अधिक असूनही त्याकडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डोळेझाक करीत आहेत.


डेअरी डिप्लोमावाल्यांनी फार तर एखाद्या मोठय़ा डेअरीत दूधप्रक्रिया, परीक्षण, गुणवत्ता नियंत्रण अशा प्रकारचे तांत्रिक कर्मचारी बनणे किंवा स्वत:चा व्यवसाय उभा करणे एवढेच या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे. दोन वर्षांचा हा कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांना जनावरांच्या आरोग्यासंबंधी अधिक ज्ञान व्हावे यासाठी पूर्व परवानी घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांना दिल्या जाणार्‍या लसी, खाद्य अशा अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन घेतात. काहींना डॉक्टरांबरोबर राहिल्याने व्हॅक्सिनेशन किंवा जनावरांच्या आजारपणांबाबतही अल्पशी माहिती मिळते. या मिळालेल्या जुजबी माहितीच्या जोरावर ते थेट ‘डॉक्टर’च बनतात.

‘डॉक्टर’ बनल्याने अनेक बाबी साध्य डेअरी डिप्लोमा करून डेअरीत काम करण्यापेक्षा किंवा स्वत:च जनावरांचा सांभाळ करण्यापेक्षा ‘डॉक्टर’ बनणे हा सर्वार्थाने सोयीस्कर धंदा असतो. अन्य कामांपेक्षा जनावरांचे डॉक्टर म्हणून मिळणारा मानसन्मान आणि पैसा त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक असल्याने अनेक तरुण या पेशाकडे वळू लागले आहेत. किंबहुना डेअरी डिप्लोमा करून दोन वर्षात ‘डॉक्टर’ होण्याचे आमिष अनेक तरुणांना या क्षेत्राकडे आकर्षित करू लागले आहे. त्यांचा पशुपालकांशी असणारा थेट संपर्क व हाकेला धावून येणार असल्याने त्यांच्याविरोधात कुणी तक्रारी करण्यास पुढे धजावत नाहीत. त्याचाच गैरफायदा हे अल्पशिक्षित घेतात.

जनावरांच्या जीवाशी खेळ
जनावरांना होणार्‍या विविध आजारांची फारशी माहिती आणि अनुभव नसल्याने सरसकट ऐकिवातील कोणतेही औषध त्यांना दिले जाते. त्याशिवाय जनावरांना होऊ शकणार्‍या रेबीजसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी दिले जाणारे व्हॅक्सिनेशन हे तथाकथित डॉक्टर बिनदिक्कतपणे देतात. गाभण जनावरे, वेताना पिलू अडकल्यास ती परिस्थिती हाताळणे अशा नवशिक्यांना जमत नाही. या सर्व स्थितीत जनावरे आणि पिले दगावण्याचे प्रमाण वाढते.

व्हेटर्नरी कौन्सिलची मान्यता नाही
जनावरांवर उपचार करणार्‍याकडे व्हेटर्नरी कौन्सिलचे मान्यता प्रमाणपत्र लागते. डेअरी डिप्लोमाधारकांना स्वतंत्र डॉक्टरीचा व्यवसाय करण्याची मान्यताच व्हेटर्नरी कौन्सिलने दिलेली नाही.

कारवाई आवश्यक
माणसांच्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई होते, तसेच बोगस जनावरांच्या डॉक्टरांवर कारवाई केली जावी.

राज्यात डेअरी डिप्लोमा महाविद्यालयांचे पीक
राज्यात सध्यस्थितीत डेअरी डिप्लोमा कोर्स असलेली महाविद्यालये गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढली आहेत. ही संख्या सध्या 125 पेक्षा अधिक असून, त्यात वर्षागणिक भर पडत आहे. बहुतांश स्थानिक पुढार्‍यांची किंवा त्यांच्या नातेवाइकांच्याच या संस्था आहेत. त्यामुळेच अशा प्रकारच्या पदविका धारण करून डॉक्टर बनलेल्यांचे येत्या काही वर्षात अमाप पीक येण्याची चिन्हे आहेत. राज्यात मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ व उदगीर येथेच शासन मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आहेत.


थेट प्रश्न
डॉ. भरत राठोड, पशुसंवर्धन अधिकारी, सोलापूर


प्रश्न : डेअरी डिप्लोमाधारक जनावरांचे डॉक्टर म्हणून व्यवसाय करत असल्याबाबत तुम्हाला माहिती आहे का?
राठोड : हो, त्याबाबतची चर्चा कानावर आली आहे. मात्र तशी अधिकृत लेखी तक्रार एकही आलेली नाही.
प्रश्न : डेअरी डिप्लोमाधारकांना असा व्यवसाय करण्याची परवानगी असते ?
राठोड : नाही. ज्यांनी व्हेटर्नरीची डिग्री घेतली आहे आणि ज्यांना नागपूरला असलेल्या व्हेटर्नरी कौन्सिलने नोंदणी करून मान्यता दिली आहे, अशाच डॉक्टरांना जनावरांवर उपचाराचा परवाना दिला जातो. अन्य कुणालाही ती परवानगी नाही.
प्रश्न : तक्रार आल्यास संबंधित पदविकाधारकांवर कारवाई करून त्यांचे दवाखाने बंद करणार का ?
राठोड : त्याबाबत काय नियमावली आहे, ते बघून नियमानुसार कारवाई करु.त्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे मार्गदर्शन घेतले जाईल.
प्रश्न : बोगस डॉक्टरांप्रमाणे इथे स्वत:च शोधमोहीम राबवता येणार नाही का ?
राठोड : माणसांच्या भोंदू डॉक्टर शोधमोहिमेबाबत स्पष्ट निर्देश असले तरी जनावरांच्या डॉक्टरांबाबत तशी स्थिती नाही. त्यामुळे त्या प्रकारची शोधमोहीम राबवण्यासाठी तक्रार येणे आवश्यक आहे.

त्यांच्या बायोमेडिकल वेस्टचे काय?
आम्हाला प्रॅक्टिस करायची असल्यास व्हेटर्नरी कौन्सिलची मान्यता आणि नोंदणी करावी लागते. दर पाच वर्षांनी परवाना नूतनीकरण करावे लागते. अन्यथा आमच्यावर कारवाई होते. मात्र या डिप्लोमाधारकांकडे ना कोणती नोंदणी ना कोणता परवाना. तरी त्यांचे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. आम्हाला बायोमेडिकल वेस्ट टाकण्याबाबत महापालिकेचे पत्र येऊन आमच्याकडून शुल्क ही आकारले जाते. परंतु अनधिकृत व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई, नोटीस, शुल्कआकारणी काही नसते. डॉ. सत्यजित पाटील, पशुवैद्यक तज्ज्ञ

लोक जागृती महत्त्वाची
इंडियन व्हेटर्नरी कौन्सिल 1984 (कलम 30 ब) अन्वये नोंदणीकृत पशुवैद्यक पदविकाधारक जनावरांवर प्राथमिक उपचार करू शकतात. पण मोठे उपचार, शस्त्रक्रिया नोंदणीकृत पशुववैद्यक पदवीधारकांच्या मार्गदर्शनाखालीच करता येते. त्याकडे दुर्लक्ष होते. मुक्या प्राण्यांवर नको ते प्रयोग केले जातात. त्याबाबतच्या तक्रारी पशुपालक करीत नाहीत. तसेच, पशुसंवर्धन विभागास तक्रारीशिवाय कारवाई करता येत नाही. अप्रशिक्षितांकडून मुक्य प्राण्यांवर उपचार करून न घेण्याबाबत लोकजागृती महत्त्वाची आहे. डॉ. संदीप इंगळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना

सरकारी विमाही नाही
शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तसेच शहरातील गोठेधारकांना स्वस्तात सेवा देण्याच्या आमिषाला बळी पाडले जाते. मात्र अशा पदविकाधारक डॉक्टरकडून उपचार करून घेतलेले जनावर दगावले, तर मालकाला विमाही मिळत नाही.