आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"इझम"चा एकांगी विचार चालणार नाही : शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नव्यापिढीकडे विचारांची सूत्रे देताना एकाच "इझम'चा विचार करून चालणार नाही. ब्रिटन, अमेरिका, चीन हे देश एकेकाळी साम्राज्यवादी, वसाहतवादी, हुकूमशाही विचारसरणीचे होते. मात्र, त्या देशांनी बदलत्या विचारांचा वेध घेतला, पाया बदलला आणि आज अग्रस्थानी आहेत. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी आर्थिक सुधारणांचे निर्णय घेतले म्हणूनच आज काही सुधारणा, बदल दिसून येत आहेत. मात्र, देशातील बदलत्या स्थितीचा विचार करता जातीयवाद या चक्रात पुन्हा अडकत आहोत की काय, याची चिंता निश्चित आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
डेमॉक्रॅटिक डॉयलॉग पब्लिकेशन नेटवर्क, गांधी व्हिजन फीचर्स सोलापूर सुविद्या प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने फडकुले सभागृहात ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे संपादित "लाेकशाहीसाठी समंजस संवाद' या मासिकाच्या एप्रिल विशेषांकाचे प्रकाशन श्री. शिंदे यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, दत्ता गायकवाड, सुनील व्हसाळे, डॉ. सुभाष शास्त्री, प्रकाशक प्रमोद वाघमारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला शोभा खोरे, गो. मा. पवार, मधुकर वाघमारे, प्रकाश बुरटे, सुविद्या प्रकाशनचे बाबूराव मैंदर्गीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अरुण खोरे यांनी केले. बाबूराव मैंदर्गीकर यांनी आभार मानले.
आजचा राजकीय वावर पाहता माझ्यासह अनेकजण विचलित झालेले दिसून येतील. सावरकरांनी मांडलेले चांगले विचार निश्चितच स्वीकारले पाहिजेत. सावरकरांच्या सोयीच्या विचारांचाच प्रसार केला जातो, हे खटकते असे शिंदे म्हणाले.

प्रकाशन समारंभात डावीकडून डॉ. शास्त्री, व्हसाळे, वाघमारे, डॉ. स्वामी, सुशीलकुमार शिंदे, अरुण खोरे, पन्नालाल सुराणा, दत्ता गायकवाड आदी.
वैचारिक साहित्यही गरजेचे
श्री.खोरे म्हणाले, वृत्तपत्रांच्या चौकटीच्या भूमिकेतून बाहेर आल्यानंतर एक प्रकर्षाने लक्षात आले की वृत्तपत्रातून केवळ बातम्या, घडामोडीला स्थान मिळते. त्यात वैचारिक साहित्य असणेही गरजेचे असते. ती गॅप भरून काढण्यासाठी समंजस संवाद साधला पाहिजे. हे काम पत्रकारांनाच करावे लागार आहे.
राजकारणाला आध्यात्माचा स्पर्श
डॉ.स्वामी म्हणाले, लोकशाहीचा अर्थ एका निवडणुकीपासून दुसऱ्या निवडणुकीपर्यंत इतकाच मर्यादित आहे का, असा प्रश्न पडला आहे. राजकारणही आध्यात्मिक दृष्टीने केले पाहिजे. विनोबाजींनी सांगितले आहे, आत्मस्तुती, परनिंदा आणि असत्य बाजूला ठेवले पाहिजे. राजकारणात नेमके हेच होत नाही.
समतेच्या लढाईस नेहमीच सज्ज
१९७०ते १९८५ चा काळ सामाजिकदृष्ट्या विचारांनी भारलेला काळ होता. आता जातीचा विचार करून मते दिली, घेतली जाताना दिसत आहे. हा आपल्या जातीचा, त्याला निवडून द्या. खुल्या जागेवर निवडून येणारा मी, राखीव जागेवर पडलो याची खंत नाही. जय-पराजय राजकीय जीवनात येत असतात. लढते रहेंगे. समतेच्या लढाईसाठी नेहमीच सज्ज राहीन, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.