आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मगरीच्या हल्ल्यामध्ये बालकाचा मृत्यू, सांगली जिल्ह्यात दाेन महिन्यांत तिघांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - प्राण्यांच्या अाश्रयस्थानावर माणसांनी अतिक्रमण केल्याने कृष्णा नदीच्या पात्रातील मगरींचा माणसांवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. साेमवारी चाेपडेवाडी येथे एका बालकावर हल्ला करून मगरीने त्याचा जीव घेतल्याची घटना घडली. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अशा घटनांमध्ये तीन जणांना प्राण गमावावे लागले.

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पात्रात अंकलखोपपासून भिलवडीपर्यंत आणि कसबे डिग्रजपासून सांगलीपर्यंत गेल्या २० वर्षांपासून मगरींचे आश्रयस्थान आहे. वारणा नदीच्या पात्रातही हरिपूरजवळ मगरींचे आश्रयस्थान आहे. भिलवडीजवळ कृष्णेचे पात्र खोल आहे शिवाय मगरींना लपून राहण्यासाठी नैसर्गिक जागा आहेत. त्यामुळे या भागात मगरींचा वावर असताे. मात्र अलीकडच्या दोन वर्षांत या परिसरात यांत्रिक बोटींनी वाळू उपसा होऊ लागल्याने मगरींचे आश्रयस्थान धोक्यात आले आहे. त्यामुळे या मगरी त्यांचे रहिवास श्रेत्र सोडून अन्यत्र दिसू लागल्या आहेत.

सोमवारी सकाळी चोपडेवाडी येथे अजय शहाजी यादव या सातवीत शिकणारा विद्यार्थी आई कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असता तिच्या सोबत पोहण्यासाठी नदीत गेला. पोहत असतानाच त्याला मगरीने ओढून नेले. ही गोष्ट तेथे मासेमारी करणा-या काहीजणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बोटीतून अजयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना त्याचा मृतदेह सापडला नाही. मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घटनास्थळापासून एक कि.मी. अंतरावरील जॅकवेलजवळ त्याचा मृतदेह सापडला. पंचनामा करून त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी वसंत मोरे या ऊसतोडणी मजुराला मगरीने ठार केले होते, तर रत्नाबाई यादव या महिलेला मगरीने जखमी केले होते. गेल्या दोन वर्षांत भिलवडी परिसरात मगरीच्या हल्ल्यात ८ ते ९ जणांना जीव गमवावा लागला आहे तर २० हून अधिक लोक मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. पतंगराव कदम वनमंत्री असताना येथे नदीपात्रात कुंपण घालण्याचा प्रस्ताव पुढे आला होता; मात्र त्याला मूर्त स्वरूप आले नाही.