आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मण महासंघ उतरला रस्त्यावर; समाजाला संरक्षण देण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आरक्षण नको, संरक्षण हवे, ब्राह्मण लोकांसाठी आर्थिक महामंडळ चालू करा, ब्राह्मणांनाही अँस्ट्रॉसिटी कायदा लागू करा अशा घोषणा करत बुधवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ रस्त्यावर उतरला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सातशेहून अधिक समाजबांधव मोर्चात सहभागी झाले. शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चा निघाला.
महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (महिला आघाडी) संजीवनी पांडे, त्र्यंबक दबडे, रमेश विश्वरूपे, सचिन वेणेगूरकर, संजीवनी कुलकर्णी, रेखा संगापूरकर यांनी सह्यांचे निवेदन जिल्हाधिकरी प्रवीण गेडाम यांना दिले. अशा प्रकारचे मोर्चे बुधवारी राज्यात 35 ठिकाणी काढण्यात आले. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले. सुधाकर परिचारक, वा. ना. उत्पात, मोहन दाते, रोहिणी तडवळकर, मोहिनी पत्की, अनुजा कुलकर्णी, त्र्यंबक दबडे, रवी हलसगीकर, प्रशांत बडवे, संजीवनी कुलकर्णी उपस्थित होते. मनसेचे शहर अध्यक्ष युवराज चुंबळकर यांनी पक्षाचा पाठिंबा असल्याचे पत्र सुपूर्द केले.
का हवे संरक्षण?
1. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्राह्मण समाजाने जात-पात, घर-दार विसरून स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. परंतु आज काही लोक क्रांतिकारकांबद्दल गलिच्छ लिखाण करून गैरसमज पसरवत आहेत.

2. ब्राह्मण समाजाच्या विरोधात जाहीर सभा, मेळावे, तसेच खासगी बोलण्यातून शिवीगाळ करून अवहेलना केली जात आहे. ब्राह्मण जातीला शिवीगाळ करणारी अनेक पुस्तके छापली आहेत. महाराष्ट्र शासन याकडे डोळेझाक करत आहे.

3. प्राचीन काळापासून पौरोहित्य करणार्‍या या समाजातील अनेक कुटुंबांना वर्षातील 100 दिवसांच्या प्राप्तीवरच गुजराण करावी लागते. त्यासाठी गरीब पुरोहितांना दरमहा पाच हजार रुपये मानधन द्यावे.