आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळवीट शिकार प्रकरण : पळालेल्या आरोपींसाठी स्वतंत्र पथक नियुक्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वटवटे-जामगाव (ता. मोहोळ) येथील शिवारात करण्यात आलेल्या दोन काळविटांच्या शिकार प्रकरणात बंदुकीसह पळून गेलेल्या दोन आरोपींच्या तपासासाठी एक विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. परिसरातील सर्व गावांमध्ये पोलिस त्यांचा कसून तपास करीत असून कोल्हापूर येथेही चौकशीसाठी जाणार आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.

कोल्हापुरातील माजी आमदार लालासाहेब यादव यांचा मुलगा माधव यादव हा त्याचा नातेवाईक रणजित विजयसिंग यादव व बांधकाम व्यावसायिक मित्र विक्रम पाटील यांनी कामती येथील मंजूर नावाच्या एका तरुणाच्या मदतीने दोन काळविटांची शिकार केली. रात्रीची गस्त घालणार्‍या पोलिसांनी मारलेल्या काळविटांसह त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असणारे दोन सहकारी पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

त्या काळविटांचा बंदुकीच्या गोळीनेच मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. शिकारीसाठी वापरलेली बंदूक शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी पळून गेलेल्या आरोपींच्या तपासासाठी पथक नियुक्त केले आहे. ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींना घेऊन पोलिसांनी वटवटे परिसरातील गुन्हा घडलेल्या ठिकाणी नेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच, त्या संशयित आरोपींच्या कोल्हापुरातील घरी जाऊन तपास करण्यात येणार आहे.

शिकारीची पोलिसांनी चौकशी सुरू केलीय. मांसाचे नमुने पुढील तपासासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविणे, त्या आरोपींकडील बंदुकीचा शोध घेणे, यापूर्वी त्यांनी केलेल्या वन गुन्ह्यांची चौकशी या मुद्यांची चौकशी करण्याबाबतचे पत्र वनविभागातर्फे पोलिसांना देण्यात आले.’’ किशोर ठाकरे, उपवनसंरक्षक

पाच वर्षांपर्वीची घटना
सन 2009 मध्ये बोरामणी- तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) शिवारात दोन काळविटांची शिकार झाली होती. मुंबईतील पाच तरुणांचा त्यामध्ये समावेश असून त्यांच्यावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हे दाखल झालेत. त्याबाबत न्यायालयात अद्यापही सुनावणी सुरू आहे.