आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभवन ते पाथरूट चौक दरम्यान रंगला म्हशी पळविण्याचा पारंपारिक कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महालक्ष्मी यात्रेनिमित्त गवळी समाजबांधवांचा शनिवारी म्हशी पळविण्याचा कार्यक्रम रंगला. रंगभवन ते पाथरूट चौक हा मार्ग दुपारी एकपासून सायंकाळी सातपर्यंत बंद होता. यामुळे अक्कलकोट, सोलापूरकडे ये-जा करणार्‍या प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली. दरम्यानच्या काळात रस्त्यावरून ये-जा करणार्‍या अनेक महिला-मुले दुचाकीस्वारांना अगदी जीव मुठीत धरूनच रस्ता पार करावा लागला. हा सर्व प्रकार पोलिसांसमक्ष सुरू होता. वाहतूक पोलिसांच्या नियोजनातील ढिसाळपणा नडला.

दरवर्षी श्रावण अमावस्येला ही यात्रा असते. यंदा त्रिवार्षिक यात्रा असल्यामुळे तीस ते चाळीस हजार समाजबांधव उपस्थित होते. सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. दोनशे -तीनशे म्हशी गवळी बांधवांनी आणल्या होत्या. सिव्हिल गेट ते रंगभवनपर्यंत (वैद्यकीय महाविद्यालय गेट) म्हशी पळविण्यात येतात. रंगभवन ते पाथरूट चौक हा रस्ता नव्याने रुंदीकरण केल्यामुळे तेथे दुभाजक आहे. उजव्या बाजूने म्हशी पळविल्या गेल्या. डाव्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी होती. त्यातून खासगी जीपचालक, रिक्षा, दुचाकीस्वार ये-जा करीत होते. यावेळी काही म्हशी अंगावर आल्यामुळे वाहनधारक, महिला गोंधळले. गर्दीत जीवाच्या अकांताने मार्ग काढताना काहीजण खाली पडले. अनेकदा तर अंगावरून म्हशी उड्या मारून गेल्या. वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसला. मागीलवर्षीही महिला, ज्येष्ठ नागरिक जखमी झाले होते.
विधायकतेकडेही लक्ष
गवळी समाजबांधवांच्या महालक्ष्मी यात्रेला पावणेदोनशे वर्षाची परंपरा. खंडेराव नावाच्या गवळीला लक्ष्मीचे दश्रन या ठिकाणी झाल्याची अख्यायिका आहे. कालांतराने लोकवर्गणीतून येथे मंदिर उभारले. 1993 मध्ये जीर्णोद्धार झाला. लक्ष्मी मंदिराजवळ समाजबांधव म्हशी आणतात व पळवितात, असे अनिल गवळी यांनी सांगितले. रक्तदान, वृक्षारोपण, खाऊ वाटप अशा विधायकतेकडे कल आहे. यात्रा नियोजनासाठी देवबा डोईजोडे, तुकाराम चव्हाण, महादेव वडवणे, किसन बहिरवडे, पांडू परळकर, अनिल शहापूरकर आदींनी प्रयत्न केले.

यापुढे कार्यक्रमासाठी काळजी घेतली जाईल
यात्रेनिमित्त वाहतूक पोलिस नेमले होते. पण रस्ता बंदची माहिती देण्यात आली नव्हती. दोन दिवस अगोदर हा बदल कळवणे अपेक्षित आहे. पुढील वर्षी नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर केला जाईल. ’’ मोरेश्वर आत्राम, साहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा
म्हशींनी धडक दिल्याने दुचाकीस्वार पडला, म्हशी तशाच पुढे पळल्या
अन् थोडक्यात बचावला प्रवासी, एसटीचालक गोंधळात
बसचालकांना संबंधित रस्ता बंद असल्याची माहिती नव्हती. रंगभवन चौकात आल्यानंतर ते सातरस्ता, गुरुनानक चौक, दोन नंबर बसस्थानक ,आम्रपाली चौक ते शांतीचौक या मार्र्गे वाहने नेत असत. ग्रामीण भागातून आलेले प्रवासी यामुळे गोंधळून गेले होते. अक्कलकोटकडे जाणार्‍यांना पळत येऊन बस पकडावी लागत होती. दुपारी एकपासूनच मार्गात बदल केला होता, असे वाहक एल. जी. लष्करवाले यांनी सांगितले.

तरुणांचा गोंधळ
दुचाकीचे सायलन्स पुंगळी काढून भरधाव वाहने तरुण चालवित होते. फटाक्यांच्या आवाजामुळे म्हशी सैरावरा हुंदडत होत्या. संयोजकांचाही ताबा म्हशींवर राहत नव्हता. मोठी दुर्घटना अशावेळी घडू शकते. आयकर भवनच्या मागील बाजूस हा सोहळा घेता येऊ शकतो.