आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ टक्के कर दिल्यानंतर बिल्डर करणार काय..?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घरांचेदर अवास्तव वाढवून ठेवल्याचे खापर बांधकाम व्यावसायिकांवर फोडले जाते. त्यात तथ्य नाही. बिल्डर एक घर २५ लाखाला विकल्यानंतर त्यातील २२ टक्के हिस्सा महापालिका आणि राज्य शासनाला विविध करांच्या रूपाने देत असतो. बांधकाम साहित्याचे दर वाढतच असतात. कामगारांचा मोबदलाही वाढतच असतो. अशा परिस्थितीत कर्ज काढून एखाद्या बिल्डरने मोठा प्रकल्प सुरू केला तर तो अडचणीतच येणार. त्याची ही िस्थती कोणीच लक्षात घेत नाही. ग्राहक मात्र बजेटमधील घरच शोधत असतो. त्याच्या ‘बजेट’साठी बिल्डरचे आटोकाट प्रयत्न असतात. शासन आणि महापालिकेचे कर कमी झाले. परवाने मिळवण्याचे मार्ग सुकर केले, तरच घरांचे दर आवाक्यात येतील, असे येथील अभ्यासू बांधकाम व्यावसायिक शिरीष गोडबोले यांनी सांगितले.
प्रश्न: बांधकाम क्षेत्रात मंदी असूनही घरांचे दर अपेक्षित कमी झालेले नाहीत. घरांचा आकार कमी करून दर कमी केल्याचे दिसते. यावर एक अभ्यासक म्हणून काय वाटते?
उत्तर : याक्षेत्रात तेजी-मंदीची एक सायकलच आहे. त्यात कर्ज काढून धंदा करणाऱ्यांना कसरतच करावी लागते. मंदीच्या काळात कोणी मोठे कॉम्प्लेक्स काढले तर तो प्रचंड आर्थिक अडचणीत येतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी तो काही योजना देत असतो. आता ही मंदी फार काळ टिकणारी नाही. २०१५-१६ मध्ये पुन्हा तेजी येईलच.
प्रश्न: बिल्डरच घरांचे दर अवास्तव वाढवून ठेवतात, अशी आेरड असते. नेमके काय?
उत्तर : काहीउदाहरणांनीच दर पडताळून पाहूयात. १० वर्षांपूर्वी जुळे सोलापूर भागात एखाद्याने जागा विकत घेऊन घर बांधले तर त्याचा खर्च पाहा आणि त्यानंतरच्या पाच वर्षांनी त्याच घराला मिळणारी किंमत पाहा. मोठी तफावत दिसते. जमिनीच्या किमती वाढतात, तशा घरांच्या किमती वाढतच जातात. बिल्डर या व्यवस्थेचा एक भाग असतो. दर वाढवून ठेवणारा घटक नसतो.
प्रश्न: सोलापूरच्या तुलनेने पुण्यातील घरांचे दर जास्त आहेत. तरीही सोलापूरकर पुण्यातल्या घरांना पसंती देतो.?
उत्तर : शिक्षणाने.सोलापूरचा तरुणवर्ग पुण्यात शिक्षणासाठी जातो. नोकरीच्या िनमित्ताने स्थायिक होतो. मग त्याला घर हवे असते. त्यासाठी कितीही पैसे मोजण्याची तयारी असते. शिक्षणाचे असेच वातावरण सोलापुरात उपलब्ध करून दिले. तसेच मोठे उद्योग आणले तर हे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही.