आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापारी आता आयुक्तांविरुद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एलबीटी न भरल्यास दंड आकारण्याचा इशारा देऊन कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, ‘न्यायालयातील निर्णय जोपर्यंत लागत नाही तोवर विवरण पत्र भरायचे नाही अन् दंडही भरायचा नाही असा निर्णय चेंबर ऑफ कॉर्मसने शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला. ‘एलबीटी वसुलीला कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे कोर्टाचा निर्णय होईपर्यंत एलबीटी घेऊ नये असे व्यापार्‍यांना म्हणता येणार नाही’, असे आयुक्त गुडेवार यांनी म्हटले आहे.

एलबीटीसंदर्भात चर्चा करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी व व्यापार्‍यांची बैठक चेंबर ऑफ कॉर्मसच्या कार्यालयात झाली. त्यात एलबीटीप्रश्नी महापालिकेत होत असलेल्या व्यापार्‍यांच्या सुनावणी व एलबीटी न भरण्याबाबतच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. एलबीटी प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. त्यावरील निर्णय जो पर्यंत लागत नाही, तोपर्यंत विवरण पत्र न भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आयुक्त दंड करण्याची भाषा करत आहेत, तोही भरायचा नाही, असेही ठरवण्यात आले. व्यापार्‍यांची सुनावणी घेत असताना आयुक्तांकडून अपशब्द वापरले जात आहेत, अशा तक्रारी व्यापार्‍यांनी केल्या. आयुक्तांनी व्यापार्‍यांबरोबरचे वर्तन सन्मानपूर्वक न ठेवल्यास पुन्हा आंदोलन उभे करावे असा सूर बैठकीत निघाला.

जिल्हा व्यापारी महासंघाने एलबीटीला आव्हान दिले आहे. मुंबई हायकोर्टात 2 ऑगस्ट 2013 पासून सुनावणी सुरू झाली आहे. एलबीटीला राज्यात सर्वत्रच विरोध आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून एलबीटी रद्द करण्यासाठी किंवा पर्यायासाठी प्रयत्न चालू आहेत. असे असताना व्यापार्‍यांना बोलावून खरेदीचा तपशील व कर भरल्याच्या रेकॉर्डसह हजर राहण्याचे फर्मान आयुक्तांनी काढले. महासंघानेही व्यापार्‍यांना सुनावणीस उपस्थित राहण्याचे सुचित केले. व्यापारीही हजर राहत आहेत. मात्र सुनावणीदरम्यान आयुक्तांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, असे ‘चेंबर’चे मानद सचिव धवल शहा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. चेंबर ऑफ कॉर्मसच्या बैठकीला अध्यक्ष सिध्देश्वर बमणी, उपाध्यक्ष दत्ता सुरवसे, बसवराज दुलंगे, धवल शहा, राजगोपाळ झंवर, निलेश पटेल आदी उपस्थित होते.

एलबीटी भराच
एलबीटी भरलीच पाहिजे, तो मनपाचा पैसा आहे. जे एलबीटी, विवरणपत्र भरणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार आहे. मी कोणालाही अपशब्द वापरले नाहीत. कोणाचा अपमान केला असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे, ‘मनपाचा पैसा भरा’ असे मी सांगत आहे.’’ चंद्रकांत गुडेवार, पालिका आयुक्त