आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग १८ मधील प्रमुख दोन्ही उमेदवार पक्षबदलू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विडी घरकुल परिसरातील प्रभाग १८ येथील पोटनिवडणूक होत आहे. कॉँग्रेसचे कृष्णाहरी चिन्नी तर शिवसेनेचे महेश कोठे रिंगणात आहेत. येथे अन्य पक्षांचे उमेदवार आहेत. मात्र, लढत याच दोन उमेदवारांत होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही उमेदवार पक्षबदलू आहेत.
विकास कामामुळे विक्रमी मताधिक्याने निवडून येणार यावर कोठे ठाम आहेत. तर कोठेंच्या दहशतीला मतदार वैतागले आहेत. त्यामुळे यंदा चमत्कार होणार यावर चिन्नी ठाम आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी नगरसेवक महेश कोठे काँग्रेस सोडून शिवसेनेत गेले त्यामुळे त्यांचे पद रद्द झाले. त्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. १९९७ मध्ये याच विडी घरकुल मधून कोठे यांच्या विरोधात भाजपकडून चिन्नी यांनी निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांचा ६०० मतांनी पराभव झाला होता. आताची स्थिती उलट आहे. आता कोठे शिवसेनेकडून तर चिन्नी कॉँग्रेसकडून उभे आहेत.
काँग्रेसचे माकप करेल नुकसान
माकपने म. युसूफ शेख यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेश समिती सचिव नरसय्या आडम यांची जादू चालल्यास ते धर्मनिरपेक्ष मते आपल्याकडे खेचतील. त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. कोठे वैयक्तिक करिश्मावर मुस्लिम समाजाची मते मिळवू शकतील. कोठे यांचाच प्रभाग असल्याने त्यांचे पारडे सध्यातरी जड आहे.
निधी खेचून आणणे ही एक कला
चिन्नी दिशाभूल करत आहेत. त्यांना यापूर्वी विडी घरकुलवासियांनी नाकारले आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी विकासकामे केल्याचा आरोप ते करत आहेत. त्यांनी आधी इतर काँग्रेस नगरसेवकांचे काम पाहावे आणि मग माझ्याविषयी बोलावे. निधी खेचून आणून विकास कामे करणे ही सुध्दा कला आहे, असा टोला महेश कोठे देत आहेत.
कोठे यांची आता हद्दपारी
महेश कोठेंनी जेवढा खर्च दाखवला आहे, तेवढा विकास विडी घरकुलमध्ये झाला नाही. त्यांनी फक्त पैसा घराणेशाहीला महत्त्व दिले आहे. आमदारकीच्या वेळी दोन वेळा त्यांना मतदारांनी नाकारले आहे. ते मूळचे विडी घरकुलचे नाहीत. त्यामुळे यंदा त्यांना विडी घरकुलमधून हद्दपार करतील, असा दावा कृष्णाहरी चिन्नी करत आहेत.