आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा पुढे ठेवूनच रणनीती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेच्या शिक्षण मंडळाची निवडणूक सुरू असली तरी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवूनच रणनीती आखताना दिसत आहे. शहर उत्तर विधानसभेची जागा भाजपकडे असल्याने ती खेचून आणण्यासाठी काँग्रेसने या मतदार संघाकडे लक्ष केंद्रित केले आहे, तर हा गड कायम राखण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार याच मतदार संघातून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामुळे काँग्रेसकडून व्यंकटेश खटके, संकेत पिसे, रामचंद्र पेंगड्याल, तर भाजपकडून अनुजा कुलकर्णी, शशी थोरात, वंदना करजगी, मल्लेश सरगम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
महापालिका शिक्षण मंडळाची निवडणूक 2 ऑगस्ट रोजी गुप्त मतदान पद्धतीने होत आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 12 जुलै सायंकाळी 5.30 पर्यंत आहे. काँग्रेसकडे सहा, राष्ट्रवादी दोन तर भाजपकडे पाच असे पक्षीय बलाबल राहण्याची शक्यता आहे. ऐनवेळी बंडखोरी झाल्यास गुप्त मतदान पद्धतीमुळे दगाफटका होऊ शकतो. काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीकडून अनेक नावे समोर येत आहेत. पक्षर्शेष्ठींकडे बोट दाखवत कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवले जात आहे. आघाडीनुसार जागा ठरवण्यासाठी काँग्रेसचे शहरध्यक्ष धर्मा भोसले आणि राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष महेश गादेकर यांच्यात बुधवारी फोनवरून चर्चा झाली.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप शहर अध्यक्ष विजयकुमार देशमुख आणि काँग्रेसचे महेश कोठे शहर उत्तरला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी सर्वच पक्षांच्या बैठका होत आहेत. प्रदेशपातळीवरून फॅक्सने नावांची यादी आल्यावर दुपारी महापालिकेतील नगरसचिव कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
64 अर्जांची विक्री - निवडणूक प्रक्रिया मनपा नगरसचिव कार्यालयाकडून सुरू असून, बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 64 अर्जांची विक्री झाली. विद्यमान नगरसेवकांनी अर्ज नेले. गुरुवारी सायं. 5.30 पर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.’’ ए. ए. पठाण, नगरसचिव
भाजपत 15 नावांची चर्चा - भाजपकडून शिक्षण मंडळावर जाण्यासाठी 70 जण इच्छुक असले तरी त्यापैकी 15 नावे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मल्लेश सरगम, अनुजा कुलकर्णी, शशी थोरात यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय गौसअहमद ट्रंकवाले, बिपीन धुम्मा, लिंगराज मुदगोंड, लिंगराज जवळकोटे, वंदना करजगीकर, निर्मला घुगे, राजकुमार पाटील, बाबूराव जमादार, हृषीकेश अकतनाळ, शोभा नष्टे, दीनानाथ धुळम, यशवंत कोंडा, रमेश गायकवाड, सुभाष कारंडे, दीपक सोनकवडे, धोंडिराम माने, डॉ. राजंद्र गाजूल, डॉ. रफीक सय्यद आघाडीवर आहेत. मुंबईत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता अंतिम यादी येणार आहे.
राष्ट्रवादीत पाच नावावर विचार - राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा येण्याची शक्यता असून, दोन जागेसाठी 60 जण इच्छुक आहेत, पण त्यापैकी दहा नावे समोर ठेवून पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. महापालिका निवडणुकीत ज्या समाजाला न्याय देता आला नाही त्या समाजातील नावे समोर ठेवून चर्चा करण्यात आली. लिंगायत समाजास न्याय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात आले. बालाजी जक्का, चंद्रकांत पवार, सादिक कुरेशी, अनिता गवळी, अरुणा वर्मा, विठ्ठलसा चव्हाण, दिनेश शिंदे यांच्या नावाची चर्चा आग्रक्रमाने सुरू आहे.
काँग्रेसकडून सहा नावे - काँग्रेसकडून सहाजण शिक्षण मंडळावर जाणार आहेत. पक्षाकडून 80 जण इच्छुक असले तरी जाबीर अल्लोळी, राजू कांबळे, व्यंकटेश खटके, संकेत पिसे, सुरेश गायधनकर, पांडुरंग चौधरी, राहुल चंदनशिवे, रामचंद्र पेंगड्याल, पांडुरंग वाघमारे यांची नावे आघाडीवर आहेत. ऐनवेळी राजकीय उलथापालथ झाली तर नावात बदल होण्याची शक्यता आहे. यलगुलवार, कोठे, शिंदे, चाकोते गटांकडून आपापल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न होत आहे.