आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • C.L.Thul In Solapur For Phule, Shahu Ambedkar Sahitya Parishad Program

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंधुभाव असेल तर कशाला होतील तंटे? - न्यायमूर्ती सी. एल. थूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दुसर्‍याच्या हक्काचा सन्मान करा, तुमचे हक्क अबाधित राहतील. त्यांच्या जागेवर अतिक्रमण कराल तर तुमचीही जागा अडचणीत येईल. समता, बंधुभाव असेल तर अन्याय, अत्याचार, तंटे कशाला होतील? घटनेच्या प्रस्तावनेतच समता, न्याय व बंधुभाव अधोरेखित झाला. तोच घटनेचा आत्मा आहे. त्याचे पालन झाले पाहिजे. त्यासाठी कायदा तळागाळापर्यंत पोचवला पाहिजे, अशी अपेक्षा एससी, एसटी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी येथे व्यक्त केली.

फुले, शाहू, आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी न्या. थूल यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदे तज्ज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यासमवेत प्रा. रेवण शाबादे यांनी लिहिलेल्या ‘करुणाघन महात्मा बसवेश्वर’ या ग्रंथाला चां. भ. खैरमोडे चरित्रात्मक लेखन पुरस्काराने गौरवण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. भटक्या विमुक्त जाती-जमाती अभ्यास आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके अध्यक्षस्थानी होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमासाठी मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

न्या. थूल पुढे म्हणाले, ‘‘महाडच्या तळ्याचे पाणी मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला. वंचितांसाठी लढा उभारून मानवाधिकाराचे जनक झाले. मोक्याच्या जागा पटकवा, शासनकर्ती जमात बना, असा सल्ला त्यांनी दिला. शासन तुमचे असेल तरच अधिकार गाजवाल, असा त्याचा अर्थ. याच अधिकाराने वंचितांना न्याय देण्याचे काम झाले पाहिजे. कायद्याचे ज्ञान आणि तो कुठे, कसे वापरायचे हे जरी कळले तरी समाजातील अन्याय बर्‍याच अंशी कमी होईल.’’ निवड समितीचे अध्यक्ष दयानंद माने, प्रा. डॉ. तानाजी देशमुख, न्या. थूल यांच्या कन्या स्मिता थूल, प्रा. सुहास उघडे आदी व्यासपीठावर होते. अर्जुन धोत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

बसव विचारांना पुरस्कार
कन्नड साहित्यात बसवेश्वरांच्या विचारांना खूप महत्त्व आहे. त्यांची वचने साध्या, सोप्या भाषेत आहेत. जातविरहित समाज त्यांनी बसवकल्याणमध्ये उभा केला होता. अशा थोर नि क्रांतिकारी विचारांना आज पुरस्कार मिळाला आहे, असे मी समजतो.’’ प्रा. रेवण शाबादे, लेखक

दुर्बलांनी जगायचे कसे?
देशाच्या राज्यघटनेने सामान्यांना जगण्यासाठी जबरदस्त कवचकुंडले दिली. परंतु जागतिकीकरणात खासगीकरण, उदारीकरण आले आणि दुर्बल हतबल झाले. त्यांची सुरक्षितता धोक्यात आली. मुडदे दिसत आहेत; परंतु मारेकरी दिसत नाहीत.’’ उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक

लोकशाहीची कास धरावी
राजकारणात राजेशाहीऐवजी लोकशाहीची कास असावी. त्यासाठी बुद्धीप्रामाण्य जोपासणे गरजेचे आहे. यातूनच समाजातील विषमता संपून जाईल. घटनादत्त समानतेची फळे सर्वांना चाखायला मिळतील.’’ बाळकृष्ण रेणके, माजी अध्यक्ष भटक्या, जाती, जमाती अभ्यास आयोग