आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कारभारावर आता 275 कॅमेर्‍यांची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गतिशील व पारदर्शी नागरी सेवा पुरवण्यासाठी महापालिकेत ई-गव्हर्नन्स आणि जमा-खर्च ताळेबंदासाठी द्विलेखा पद्धतीचा अवलंब अनेक महापालिकांनी केला असला तरी सोलापूर महापालिकेत मात्र केवळ बोलबालाच आहे. तीन वर्षांपूर्वी नाक्यांवर बसवलेले कॅमेरे अडगळीत टाकून दिले होते. आता नव्याने एस्कॉर्ट नाक्यांसह झोन कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पूर्वीचा अनुभव पाहता कॅमेरा फुटेजच्या भीतीने कारभारातील पारदर्शकता व गतिशीलता वाढणार काय याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

विनाव्यत्यय सेवा देण्यासाठी महापालिकेत ई-गव्हर्नन्स आणि महापालिकेतील आर्थिक व्यवहारातील पारदर्शीपणासाठी द्विलेखापध्दती प्रणाली सुरू करण्याचे आदेश 2010 मध्ये शासनाने दिलेले होते. महापालिका अंदाजपत्रकाच्या अर्धा टक्का तरतूद करण्याकडे महापालिका प्रशासन आजवर दुर्लक्ष करत आले आहे. ई-गव्हर्नस्कडे दुर्लक्ष करत असताना मनपाच्या आठ झोन कार्यालयांसह सहा एस्कॉर्ट नाक्यांवर सीसीटीव्ही बसवले आहेत. ई-गव्हर्नन्स् सिस्टिम कार्यान्वित झाली तर प्रत्येक कागद संगणकीय यंत्रणेतून कोठे आहे, हे तपासता येतो.
झोन कार्यालयांसह एस्कॉर्ट नाके सीसीटीव्हीने जोडले आहेत. यासाठी सुमारे 38 लाख रुपये खर्च झाले आहेत.
काय होईल फायदा
नाक्यावरील एस्कॉर्टपोटी जादा रक्कम घेतली जात असल्याची तक्रार कमी होईल. नाक्यावरून ये-जा करणार्‍या वाहनांची नोंद होईल. महापालिका आयुक्तांना सर्व्हरवर थेट माहिती उपलब्ध होईल.

किती दिवस टिकणार
तत्कालीन आयुक्त रणजितसिंह देओल यांनी नाक्यांवर कॅमेरे बसवले होते. त्यांची बदली झाल्यावर ते बंद पडल्याची सबब सांगत काढून ठेवण्यात आले. आता गुडेवार गेले, ही यंत्रणा किती दिवस टिकणार हा प्रश्न आहे.

नाके जोडले
275 कॅमरे बसवून ते सर्व्हर रूमला जोडले आहेत. शहरातील आठ एस्कॉर्ट नाक्यांपैकी विजापूर रोड, देगाव, बार्शी, पुणे, हैदराबाद, तुळजापूर मार्गावरील नाके जोडले आहेत. चित्रण मनपात बसून आयुक्तांना पाहता येईल. शिवाय मोबाइलवरही पाहता येईल.
सचिन कांबळे, मनपा संगणक विभाग प्रमुख

द्विलेखा पद्धतीचे काम

द्विलेखा पद्धतीनुसार नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. एखाद्या विभागाकडून जमा होणारी रक्कम तसेच खर्चली जाणारी रक्कम याची माहिती या पद्धतीने कळेल. यामुळे विभागानिहाय ताळेबंद तयार होईल.
सुकेश गोडगे, मुख्य लेखापाल, मनपा