आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या पतींना घरी आणतील का हो ....!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठा वस्तीतील हरिश माने यांच्या पत्नी सुनीता, मुलगा महेश आणि सासू सुशिलाबाई कडली यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतल्यानंतर पतीबद्दल माहिती देताना.
सोलापूर - मराठावस्तीत पाच पत्र्यांचं घर. आठ बाय आठची एकच खोली, त्यातच स्वयंपाक घर, हॉल. हरिष दौलत माने सोलापुरातील ट्रॅव्हल्स कंपनीत आचारीचे काम करायचे. पत्नी, मुलासह सुखाचा संसार सुरू होता. रविवारी सकाळी नेपाळमधून मानेंच्या ट्रॅव्हल्स कंपनीतून घरी फोन आला. तुमच्या पतीचे निधन झालेय. सुनीता मानेंना धक्काच बसला.

बारा तासांपूर्वी म्हणजे शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमाराला त्या पतीसोबत फोनवर बोलल्या होत्या. मी सुखरूप असल्याच सांगितलं होतं. काही तासात दु:खद प्रसंग आल्यामुळे हा परिवार मानसिक स्थितीने कोलमडलायं. ४८ तासापासून पतीचा मृतदेह कधी येणार याची वाट पाहत आहेत. पतींना अजून केव्हा आणणार असा प्रश्न त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’शी बोलताना केला.

आचारी म्हणून चार वर्षांपासून हरिष काम करतात. एप्रिल रोजी ते ट्रॅव्हल्ससोबत दिल्लीपर्यंत रेल्वेने गेले. बसने नेपाळला पोहोचले. शनिवारी भूकंप झाल्यानंतर ते घाबरले होते. पण, सुखरूप असल्याचा निरोप त्यांनी कळविला होता. त्यांचा मृत्यू कसा झाला आहे हे अद्याप समोर आले नाही. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी परिवाराची भेट घेतली. माजी नगरसेविका लता फुटाणे यांच्यासह परिसरातील महिला, नागरिक परिवाराची भेट घेऊन धीर देत आहेत.


मी मंगळवारी येईन...
मीसुखरूप आहे. काळजी करू नको. सोमवारी (ता. २७) दिल्लीतून बसणार आहे असे शनिवारी सांगितले होते. रविवारी ते गेल्याचा निरोप मिळाला. त्यांचा मृतदेह सोलापूरला आणा. माझं कोण एकेल का? आम्ही जिल्हाधिकारी प्रशासनाला जाऊन माहिती दिली आहे. बुधवारपर्यंत मृतदेह आणतो म्हणालेत. आमचा आधार गेला हो...असे सांगत श्रीमती सुनीता रडत होत्या.
पप्पा मलाही त्या दिवशी बोलले. माझ्या मावसभावाचे लग्न सहा मे रोजी आहे. आम्ही कपडेही घेणार होतो. पण, माझे पप्पाचं नाहीत. अशा भावना मुलगा महेशच्या होत्या. अकरावीची परीक्षा दिली असून तो जैन गुरुकुलमध्ये शिकतोय.