सोलापूर - साहेब (शरद पवार) सांगतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावीच लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे आता काहीही बोलता येत नाही. या घडामोडी सुरू असल्या तरी मी आहे त्या ठिकाणी बरा आहे, असे सूचक उद्गार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांनी काढले. राजकीय प्रश्नांना बगल देत त्यांनी अतिशय सावध भूमिका मांडली.
विजय-प्रताप युवा मंचचे शहराध्यक्ष राजू सुपाते यांनी देगाव येथे रविवारी दुपारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. पत्रकारांनी माढा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत आपले नाव आघाडीवर आहे. नाव निश्चित झाले का, असे विचारले. या सर्व राजकीय प्रश्नांना त्यांनी उत्तर देणे रीतसर टाळले. यावेळी सुपाते परिवाराच्या वतीने श्री. मोहिते यांच्यासह प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला योगी काटकर, प्रकाश डांगे, पिंटू पाडुळकर, सिद्धू राजमाने, माऊली पवार, संजय सुपाते, राहुल सुपाते, दिलीप सुपाते, अरुण सुपाते, गोविंद सुपाते, सागर सुपाते, मयुर सुपाते आदी उपस्थित होते.