आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेळगाव लघुपाटबंधारे तलावात उजनीचे पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - शेळगाव (आर) (ता. बार्शी) येथील लघुपाटबंधारे तलावात कृष्णा-मराठवाडा जलसिंचन प्रकल्पातून उजनीचे पाणी देण्याचा निर्णय जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे व पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच जवळगाव (जि. बार्शी) येथील मध्यम प्रकल्पात कृष्णा-मराठवाडा जलसिंचन प्रकल्पातून उजनीचे पाणी देण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली असून त्याचा प्रस्ताव आणि अंदाजपत्रक तयार झाले आहे. त्याला शासनाची मंजुरी घेऊन हे काम तातडीने सुरू करण्यात यावे, असे निर्देश शिंदे यांनी अधिकार्‍याना दिले.

बैठकीस मुख्य अभियंता घोलप, अधीक्षक अभियंता तोंडे, कार्यकारी संचालक उपासे, बार्शी पंचायत समितीचे सदस्य सचिन बादगुडे, शेळगाव (आर) चे माजी सरपंच सुरेश आडसूळ, प्रकाश गायकवाड, शाहू कचरे, गौडगावचे सरपंच राजाभाऊ चव्हाण आदी उपस्थित होते.उजनी धरणातील पाणी मराठवाड्याला देण्यासाठी कृष्णा-मराठवाडा जलसिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या मार्गालगतच उताराच्या दिशेने शेळगाव (आर) लघुपाटबंधारे तलाव व जवळगाव मध्यम प्रकल्प आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या आसपास इतर काही तलाव बांधण्यात आल्यामुळे तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे हे दोन्ही प्रकल्प आजतागायत एकदाही पूर्णपणे भरलेले नाहीत. स्थानिक दुष्काळी परिस्थिती तसेच पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता या दोन्ही प्रकल्पांमध्ये कृष्णा-मराठवाडा जलसिंचन प्रकल्पातून उजनीचे पाणी देण्यात यावे, अशी मागणी सोपल यांनी केली.
या दोन्ही प्रस्तावांना जलसंपदामंत्री शिंदे यांनी सहमती दिली. जवळगाव मध्यम प्रकल्पाला उजनीचे पाणी देण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली असून त्याचा प्रस्ताव आणि अंदाजपत्रकही तयार केले आहे. त्याला शासनाची मंजुरी घेऊन हे काम तातडीने सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी अधिकार्‍याना दिले. तसेच शेळगाव (आर) लघुपाटबंधारे तलावास उजनीचे पाणी देण्यासाठी कृष्णा-मराठवाडा जलसिंचन प्रकल्पाच्या ठिकाणी गेट बांधणे तसेच सुमारे १४०० मीटरचे कॅनॉल तयार करणे आवश्यक आहे. या संदर्भातील प्रस्तावही तातडीने तयार करून त्यास शासनाची मंजुरी घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असे त्यांनी सांगितले.
शेतीला तसेच पिण्याच्या पाण्याची सोय
शेळगाव (आर) लघुपाटबंधारे तलावासाठी फक्त १०८ एमसीएफटी तर जवळगाव मध्यम प्रकल्पासाठी १२०० एमसीएफटी पाणी लागणार आहे. तसेच गेट तयार करणे, कॅनॉल बांधणे यासाठी अत्यल्प खर्च अपेक्षित आहे. शेळगाव (आर) लघुपाटबंधारे प्रकल्पात पाणी उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा परिसरातील शेळगाव (आर), वानेवाडी, काटी, सावंतवाडी क्र. १ व २ आदी गावांतील शेतीला तसेच गावकर्‍याच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. जवळगाव मध्यम प्रकल्पातही पाणी उपलब्ध झाल्यास परिसरातील दुष्काळी गावांना त्याचा फायदा होईल, असे सोपल यांनी सांगितले.