आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनमुक्ती, तंटामुक्तीसाठी कीर्तनातून जनजागृती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पोलिस आणि कीर्तनकार ही कल्पना आपण करू शकणार नाही. पण, सोलापूर पोलिस अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखेत एक आगळाच पोलिस हवालदार आपल्याला पाहायला मिळतो. विठ्ठल शामराव माने असे त्यांचे नाव आहे. मूळात कीर्तनाचा पिंड असलेल्या या व्यक्तीने आपले कर्तव्य बजावत असताना व्यसनमुक्ती व तंटामुक्तीसाठी 1200 हून अधिक प्रवचन, कीर्तन व व्याख्यानातून समाजप्रबोधन केले आहे.

माने हे मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगावचे. 1982 मध्ये पुणे ग्रामीण दलात ते भरती झाले. इंदापूर, भोर, देहूरोड आदी ठिकाणी माने यांनी सेवा बजावली. 2009 मध्ये ते सोलापूर ग्रामीण दलात बदलून आले. इंदापूर येथील तंटामुक्त मोहिमेतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन तंटामुक्त मोहिमेची माहिती संकलित करण्यासाठी समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती तत्कालीन पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांनी केली. तेव्हापासून जिल्ह्यातील तंटामुक्त मोहिमेने गती घेतली आहे.

30 वर्षांच्या सेवेत माने यांनी कर्तव्य बजावत समाज प्रबोधनाचाही वसा घेतला आहे. 1997 पासून त्यांची प्रबोधनाची मोहीम सुरू झाली. कामातून वेळ काढून त्यांचे हे कार्य सुरू आहे. युवा पिढी सुसंस्कारित व्हावी याकरिता शाळा, महाविद्यालये, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच महापुरुषांची जयंती व पुण्यतिथीनिमित्त व्याख्याने, कीर्तन, व्याख्यानातून जनजागरण सुरूकेले. शिवाय शिक्षकांच्या गटसंमेलनात ‘नीतीमूल्ये विनामूल्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. गेल्या 22 वर्षात सातशे ते आठशे जणांची दारू सोडवली.

शासनामार्फत गौरव
इंदापूर येथील तंटामुक्ती मोहिमेतील त्यांची कामगिरी पाहून राज्य शासनाच्या वतीने विठ्ठल माने यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

तंटामुक्तीसह अनेक योजनेत सहभाग
तंटामुक्त गाव मोहीम प्रभावरीत्या राबवण्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन तंटामुक्त समित्यांमध्ये जनजागृती केली. व्यसनमुक्ती, अवैध दारू विक्रेत्यांचे पुनर्वसन, लोकन्यायालय, सामुदायिक विवाह सोहळा, वैद्यकीय शिबिर, ग्रामसुरक्षा दलाची स्थापना आदी उपक्रम राबवण्याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, स्त्रीभ्रूण हत्या, अंधर्शद्धा निर्मूलन योजनेत आपल्या व्याख्यानातून जनजागृती आणली आहे.

घरातून मिळाली प्रेरणा
घरात भागवत संप्रदायाची परंपरा आहे. आई-वडील कीर्तनकार होते. तसेच वडील बंधू उत्तम गायक आहेत. त्यामुळे घरातून भजन, कीर्तन, प्रवचनासाठी प्रेरणा मिळाली. तसेच देहूरोड येथे कार्यरत असताना संत तुकाराम यांना साक्षी ठेवून समाज प्रबोधन करण्यासाठी व्याख्यान, कीर्तन, प्रवचनाला प्रारंभ झाला.’’
- विठ्ठल माने, हवालदार, सोलापूर