आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत नगरमध्ये सायकल दुकानात घुसली कार; आजोबांसह तीन नातवंडे बचावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्वागत नगरजवळील केंगनाळकर हायस्कूलजवळ हिना सायकल मार्ट दुकान आहे. नेहमीप्रमाणे महेताब जेऊरे आपल्या तीन नातवंडांसह दुकानात होते. एका तरुणाच्या सायकलचे पंक्चर काढण्याचे काम सुरू होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास भरधाव कार रिक्षा स्टॉपच्या फलकाला धडकली. त्यानंतर ती कार थेट सायकल दुरुस्तीच्या दुकानात घुसली. तत्पूर्वी प्रसंगावधान राखून जेऊरे हे आपल्या तीन नातवंडांना घेऊन दुकानाच्या आतील बाजूस आले. त्यामुळे ते वाचले. संधी न मिळालेले तीन ग्राहक जखमी झाले.

साहेब... देवाची कृपा (अल्लाहकी र्मजी, उपरवाले की दुआ) होती म्हणून आम्ही वाचलो.. समोर मोठा अपघात दिसत होता. देवाने चांगली बुद्धी दिल्यामुळे अनर्थ टळला, अशा शब्दांत महेताब जेऊरे यांनी भावना ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली. मंगळवारी हा विचित्र अपघात घडला.

जेऊरे हे गेल्या 20-25 वर्षांपासून सायकल दुकान चालवितात. पत्नी, तीन नातवंडे मुजम्मील (वय 13), सर्फराज (वय 12), सोहेल (वय 8) यांच्यासोबत ते राहतात. अपघातावेळी त्यांच्या पत्नी नूरजहाँ या दुकानाशेजारील कट्टय़ावर बसल्या होत्या. दोघा नातवंडांचे वडील हयात नसल्यामुळे आजोबा-आजीच पालनपोषण करतात. शिक्षण घेत ते आजोबांना दुकानात मदतही करतात. दुकातून कार बाहेर काढण्यासाठी दोरखंड बांधून ओढण्यात आले. याकामी लोकांनी मदत केली. कार चालक सुनील सोनद (रा. स्वागत नगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मदतीसाठी धावले शेकडो हात
घटनेनंतर राष्ट्रवादीचे फारूक मटके, शिक्षक करीम आहेरवाडी, नगरसेविका इनामदार, पोलिस निरीक्षक अनिल बेणके, फौजदार एम. एच. निंबर्गी यांच्यासह पोलिस,नागरिकांनी मदत केली. कारला दुकानातून बाहेर काढले. दुपारी अडीचच्या सुमाराला पोलिसांनी क्रेन मागवून कार पोलिस ठाण्यात नेली.

दुकानजवळचे तीन ग्राहक जखमी
असीफ नूरअहमद शेख (वय 21, रा. विनायक नगर), कृष्णा शंकर साखरे (वय 24), उमेश चिदानंद बोळेकर (वय 28, रा. दोघे जयशंकर तालीमजवळ, मोदी) हे जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उमेशची प्रकृती गंभीर असल्यामुळे अतिदक्षता विभागात हलवले आहे. ते नातेवाइकांना भेटण्यासाठी स्वागत नगरला गेले होते अन् हा प्रकार घडला.

काही क्षणात कार घुसली
वीटभट्टीकडून कार भरधाव आली. तेथील रिक्षा स्टॉपच्या फलकाला धडकून थेट दुकानात घुसली. पत्राशेडमध्ये आवाज आला. नागरिक मदतीसाठी धावले. दोघेजण कारमध्ये होते. अपघातानंतर एकजण पळून गेला. दुसरा किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती नातवांच्या शिक्षणासाठी साठाव्या वर्षीही सायकल दुकानात काम करणार्‍या जेऊरेंनी दिली.

कडक कारवाई होईल
भररधाव कारने (एमएच 13 एझेड 4041) तिघांना ठोकरले आहे. संबंधितांवर कडक करवाई होईल. पोलिसांचा तपास सुरू आहे. एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.’’
-सुरेश सोनकवडे, पोलिस निरीक्षक

दुर्दैवी घटना, मदत करू
आमचा परिसर प्रभाग क्रमांक 41 आहे. बहुतांश कामगार राहतात. जखमी झालेल्या तरुणांना चांगले उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न आहेत. घटना दुर्दैवी आहे, पीडितांना मदत करू.’’
-परवीन इनामदार, नगरसेविका