आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Car, Bike Number Plate Issue At Solapur, Diyva Marathi

फॅन्सी नंबरप्लेटच्या गाड्या बोकाळल्या, ‘दादा, अप्पा’चा सुकाळ, कारवाई नाहीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांच्या नंबर प्लेटशी छेडछाड करणे हा गुन्हा आहे. अपघात किंवा अन्य अनेक तपासकामांमध्ये वाहन क्रमांकाचे महत्त्व असते. सोलापुरात मात्र नियम तोडून नंबर प्लेटशी छेडछाड करण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेटवर आता फॅन्सी नंबर्स सहजगत्या दिसू लागल्या आहेत. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने अशा वाहनधारक निर्ढावले आहेत.
दोन वर्षांपूर्वी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. दीड आठवडा चाललेल्या या कारवाईत मोठय़ा प्रमाणात आर्थिक दंड वसूल झाला. नंतर मात्र कारवाई थंडावली. हाय सेक्युरिटी नंबरप्लेट राज्यात अनिवार्य करण्याचा विचार महाराष्ट्र शासन करत आहे.

पुढील महिन्याभरात यावर निर्णय अपेक्षित आहे. हाय सेक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक केल्यास फॅन्सी नंबरप्लेटला चाप बसेल असे प्रशासनाला वाटते. परंतु या निर्णयाची तरी अंमलबजावणी होणार का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

नंबरप्लेटसाठीचे नियम
1 नोंदणी क्रमांक इंग्रजी भाषेत व कॅपिटल अक्षरात. प्रमाणित अक्षरांपेक्षा मोठय़ा अक्षरात लिहू शकता. क्रमांक इटॅलिक नसावा. खासगी वाहनांचा क्रमांक पांढर्‍या पृष्ठभागावर काळ्या रंगात. व्यावसायिक वाहनांचा क्रमांक पिवळ्या पृष्ठभागावर काळ्या रंगात. नंबरप्लेटचा आकार 200 मिमी बाय 100 मिमी हवा.

2 सर्व दुचाकी व अपंगांसाठीच्या तीनचाकीच्या मागील प्लेटवरील अक्षरांची उंची 35 मिमी, जाडी 7 मिमी व अंतर 5 मिमी, आकड्यांची उंची 40 मिमी, जाडी 7 मिमी व अंतर 5 मिमी. पुढच्या बाजूस असणार्‍या प्लेटवरील अक्षरे व आकड्यांची उंची 30 मिमी, जाडी 5 मिमी असली पाहिजे.

हाय सेक्युरिटी नंबरप्लेट
नंबरप्लेटला स्नॅपलॉक सिस्टिम दिल्यामुळे एकदा वाहनांना बसवल्यानंतर काढणे अवघड आहे. तोडूनच काढावी लागते. एकदा काढल्यानंतर पुन्हा कसल्याही परिस्थितीत वापरात येत नाही. होलोग्रामही असतो. त्यामुळे वाहनाची चोरी रोखता येते. प्लेटवर कोरीव पद्धतीने नंबर टाकण्यात येतो. त्यामुळे ती ठळक दिसते. अन्य नंबरप्लेटच्या तुलनेने दर जास्त आहेत.

4 लाख दुचाकीची संख्या अंदाजे
55 हजार कारची संख्या अंदाजे
6500 वाहनांवर याआधी करण्यात आली होती कारवाई
6.5 लाख रुपये याआधी करण्यात आलेल्या कारवाईतून दंड वसूल

चर्चा करून कारवाईचा धडाका सुरू करणार
फॅन्सी नंबरप्लेटवरील कारवाई सध्या थंडावली आहे. वरिष्ठांशी या संदर्भात चर्चा करून आठ ते दहा दिवसांत कारवाई सुरू करण्यात येईल. सध्या नाकाबंदी पथकाद्वारे कारवाई होतच आहे. याला व्यापक रूप देण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा झाल्यावर कारवाईचा धडाका सुरू करण्यात येईल. यशवंत शिर्के, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा