आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cartoonist To Director Of Five Star Hotel, Journey Of D Ram Reddy

व्यंगचित्रकार ते पंचतारांकित हॉटेल संचालकापर्यंत प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालाजी अमाइन्सचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी व्यंगचित्रकार होते. या कलेला वाहून घेणारे मासिक त्यांनी सोलापुरातून चालवले. ही बाब बहुतांश सोलापूरकरांना माहीत नसावी. या कलेला उद्यमशीलतेची जोड मिळाली आणि सोलापुरात त्यांनी साकारले पहिले पंचतारांकित हॉटेल ‘बालाजी सरोवर प्रीमियर.’ त्याचे उद्घाटन शनिवारी होत आहे. त्यानिमित्त रेड्डी यांची श्रीनिवास दासरी यांनी घेतलेली मुलाखत..


प्रश्न : तेलंगण भागातील सिद्धी पेठेतल्या शेतकरी कुटुंबातील जन्म. तेथून सोलापूरपर्यंतचा प्रवास कसा?
रेड्डी : विद्यार्थीदशेपासूनच वाचनाची आवड. वर्तमानपत्रे उघडल्याशिवाय बाहेर जायचे नाही. व्यंगचित्रे पाहूनच वाचन व्हायचे. घटना, घडामोडी आणि त्यावरील मार्मिक टिपण्णी मला खूप आवडते. त्यातूनच व्यंगचित्रांकडे आकृष्ट झालो. काही चित्रे स्वत: रेखाटली. हैदराबादच्या ‘हास्यरमणी’ या मासिकाला पाठवली. त्यात ती छापून आली. खूप आनंद झाला. त्यानंतर सातत्याने चित्रे येतच राहिली. त्यांनंतर वाटले, की व्यंगचित्रांना वाहून घेणारे मासिक काढावे. ‘मुसी मुसी नव्वुलु’ हे मासिक सुरू केले. सोलापुरात आल्यानंतरही ते सुरू होते. कामाच्या व्यापातून त्यात खंड पडला, तो कायमचाच.

प्रश्न : येथे कोणत्या उद्देशाने आलात?
रेड्डी : 1985 मध्ये आम्ही भावंडे सोलापूरला आलो. सिमेंट पाइपचे उत्पादन सुरू केले. त्यानंतर रासायनिक उद्योगाचा विचार केला. सोलापूरच्या लगत असलेल्या तामलवाडी येथे ‘बालाजी अमाइन्स’ची उभारणी केली. आम्ही नेहमीच पर्यायी उद्योगाच्या शोधात असतो. त्यातूनच विविध उद्योग केले. हैदराबाद येथे ‘सीएफएल बल्ब’ची निर्मिती सुरू झाली. त्यानंतर आता सोलापुरात पंचतारांकित हॉटेल.

प्रश्न : उद्योगांसाठी सोलापूरच का?
रेड्डी : सोलापूरला भविष्य आहे. अनेक राज्यांना जोडणार्‍या रेल्वेचे जाळे सोलापुरातून जाते. येथील मनुष्यबळ कुशल आहे. विमानसेवा हवीच असे मी म्हणणार नाही. परंतु रस्ते चांगले असावेत. येण्या-जाण्यातील वेळ कमी झाला की अनेक प्रश्न सुटतील. या बाबी केवळ सोलापुरातच आहेत. नाही तरी पुणे, मुंबई, नाशिक येथे आता उद्योगांना जागा नाही आणि सोलापूरशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सोलापूर आता विकसित होणारे शहर आहे.

प्रश्न : सोलापुरात पंचतारांकित हॉटेलचा ग्राहक?
रेड्डी : का नाही? कॉर्पोरेट क्षेत्रातील बहुतांश मान्यवर सोलापुरात येतात. चांगल्या हॉटेलच्या शोधात असतात. पैसे मोजायला तयार असतात. त्यांच्यासाठी बालाजी सरोवर हा उत्तम पर्याय आहे. भविष्याचा वेध घेता बडे प्रकल्प जे प्रस्तावित आहेत, त्यांना पंचतारांकित हॉटेलची गरजच आहे. हां, सेवेच्या दराचा आम्ही जरूर विचार केला; परंतु पंचतारांकित दर्जेशी तडजोड नाही.