आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सोन्यासारख्या' लेकीचे झाले शुभमंगल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लेकीचा विवाह बुधवारी होता आणि त्याआधी रविवारी (२४ मे) पहाटे लग्नाकरता आणलेले सोळा तोळे दागिने चोरांनी पळवले. वधूपिता अरुण जाधव यांच्यावर ही आपत्ती आली. सासरकडच्या मंडळींनी मोठे मन दाखवले. दागिने चोरीला गेले तरी जाऊ दे, लग्न सोन्यासारखं करू, असे म्हणत त्यांनी धीर दिला. बुधवारी सोलापुरातील सुशील रसिक सभागृहात जाधव यांची कन्या अश्विनी आणि बागलकोट येथील राजीव कलादगी यांचा विवाह थाटात झाला. सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र नवरीच्या गळ्यात घातल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
श्री. जाधव यांचे मित्र आचारी भीमा महाराज यांनी लग्नाच्या जेवणाचा खर्च स्वत: केला. अरुण जाधव हे सोलापुरातील विकास नगर येथे राहतात. मोहोळमध्ये त्यांचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. त्यांची मुलगी अश्विनी बीई पदवीधर आहे. बुधवारी तिचा राजीव यांच्यासोबत विवाह झाला. ते एका बँकेत व्यवस्थापक आहेत. सोळा तोळे दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारल्यामुळे हा परिवार पार खचला होता. नातेवाइक, मित्रांनी त्यांना धीर दिला. बागलकोटच्या पाहुण्यांनीही माणुसकी दाखवली. सोने जाऊ दे, सोन्यासारखी मुलगी आम्हाला पाहिजे. लग्न थाटात करू असे म्हणत साथ दिली.
भीमा महाराज आले धावून
जाधवयांचे जवळचे मित्र भीमा महाराज. ते आचारी काम करतात. लग्नाच्या जेवणाची आॅर्डर त्यांना देण्यात आली होती. पण, जाधव यांच्या घरात चोरी झाल्याचे समजताच ते जाधव यांच्या मदतीला धावले. हळदी अणि लग्न समारंभाचे सुमारे पंधराशे लोकांचे जेवण त्यांनी स्वखर्चाने केले. जाधव यांना तुम्ही काळजी करू नका, मी सर्व जेवण तयार करतो. पैशाचे आपण नंतर पाहू असे म्हटल्यामुळे मी तिकडे फिरकलो नाही. ही आठवण सांगताना जाधव यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
बातम्या आणखी आहेत...