आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजार महिला घेणार स्त्रीभ्रूण हत्येविरोधी शपथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी कुंभारी येथील गोदुताई गृहनिर्माण संस्थेला भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी सव्वापाचला सुमारे पाच हजार महिला स्त्रीभ्रूण हत्येविरोधात शपथ घेतील, अशी माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव दिनेश शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस युवती मेळाव्यासाठी त्या मंगळवारी सोलापुरात येत आहेत. त्यानिमित्त गोदुताई नगरातील कामगारांच्या घरांची पाहणी करतील. आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प म्हणून लौकिक मिळविलेल्या या संस्थेला भेट देण्याची इच्छा स्वत: सुळे यांनी व्यक्त केली. तो संस्थेचा बहुमान असल्याचे आडम म्हणाले. स्त्रीभ्रूण हत्येविरोधी मोहीम, महिला सक्षमीकरण आणि युवा धोरण अशा सामाजिक विषयांमध्ये सुळे यांचे कार्य अतुलनीय आहे. असा कार्यक्रम राज्यात बहुधा पहिलाच असावा, असेही आडम म्हणाले.
भटक्या जमातींसाठी कार्य करणार्‍या सुळेंना विडी कामगारांबद्दलही सहानुभूती आहे. या कामगारांसाठी सोलापुरात बांधलेली दहा हजार घरे कशी आहेत, त्यांचे राहणीमान कसे आहे, याबाबत उत्सुकता आहे. त्यासाठीच हा दौरा आयोजित केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.