आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा सुविधेपासून सोलापूर वंचितच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर रेल्वे पोलिसांनी प्रस्तावच पाठवला नसल्याने केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापूर विभागाला अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे. विभागातील एकाही स्थानकाचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रेल्वे पोलिस दलाच्या वतीने रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याबाबत प्रस्ताव मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना सादर केला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे व भुसावळ या विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर लवकरच अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे नियंत्रण कक्षही अत्याधुनिक करण्यात येणार आहेत. मार्च 2014 पर्यंत सर्व प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. सध्या सोलापूर रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची व्यवस्था आहे. पण, अद्ययावत कॅमेरे बसवले तर सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत झाली असती.

गुन्ह्यांवर आले असते नियंत्रण
गेल्या अनेक दिवसांपासून स्थानकावर होणार्‍या मारामार्‍या, चोरांचा सुळसुळाट अशा बाबींवर नजर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सीसीटीव्ही कॅ मेरे सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर आवश्यक असतानाही बसवण्यात येणार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्थानकावर सीसीटीव्ही बसवण्यासाठी सोलापूर रेल्वे पोलिस दलाच्या वतीने प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते. मात्र, सोलापूर रेल्वे पोलिसांनी याचा प्रस्तावच पाठवला नसल्याचे समजते. त्यामुळे अद्ययावत सुविधांपासून सोलापूरला वंचित राहावे लागणार आहे.

प्रस्तावाबाबत मला माहिती नाही
प्रस्ताव पाठविला की नाही याबाबत आता सांगता येणार नाही. मी सोलापुरात नाही. कामानिमित्त बाहेर गावी आलो आहे.
- कृष्णकांत शर्मा, विभागीय सुरक्षा आयुक्त, सोलापूर विभाग

प्रस्ताव आलेला नाही
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आदी प्रमुख रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सोलापूर रेल्वे स्थानकावर मात्र बसविण्यात येणार नाहीत.तसा प्रस्तावही माझ्या पर्यंत आला नाही.
- अनिल शर्मा, मुंबई, पोलिस महासंचालक, रेल्वे पोलिस , मध्य रेल्वे.

होमागार्डची घेतली जाणार मदत
मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील रेल्वे पोलिस दलात 1 हजार 450 जागा रिक्त आहेत. यात सोलापूर विभागामध्ये जवळपास 160 जागा रिक्त आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. ही कमतरता दूर काढण्यासाठी रेल्वे पोलिस आता होमगार्डची मदत घेणार आहेत. अतिरिक्त होमगार्डची नेमणूक मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर आदी रेल्वे स्थानकांवर करण्यात येणार आहे.