आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलिंग जमिनीच्या चौकशीचे काम पोचले 40 टक्क्यांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माळीनगर (ता. माळशिरस) येथील सिलिंग जमिनीच्या चौकशीचे काम गेल्या दोन महिन्यात 40 टक्केवर पोहचले आहे. झालेल्या चौकशीमध्ये 1 लाखा 941 नोंदीची तपासणी करण्यात आली असून यामध्ये सात-बारा उतारा, लावणचिठ्ठी आदीमध्ये मोठय़ा प्रमाणात खाडाखोड करून संपूर्ण रेकॉर्डच बनावट तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे अंतिम निष्कर्षाला पोहचण्यासाठी मदत होणार असल्याचा विश्वास अपर जिल्हाधिकारी तथा चौकशी अधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केला.

गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ चौकशीप्रक्रियेत असलेल्या या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 17 नोव्हेंबरपासून अपर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी माळीनगर सिलिंग जमीन प्रकरणाची तपासणी सुरू केली. यामध्ये 1964 साली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जप्त केलेल्या कागदपत्रांवरून तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीमध्ये 1960-61 मधील नोंदीनुसार सात-बारा उतार्‍यावर खाडाखोड झाल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी सात-बारा उतारेच फाडून टाकण्यात आल्याचे तपासणीमध्ये समोर आले आहे.

तपासातील धक्कादायक बाब..
1954 ते 1957 या कालावधीतील उतार्‍यांची तपासणी केल्यानंतर कुळाने जमिनी कसणार्‍या कुळांच्या संख्येत वाढ होत गेल्याचे समोर आले आहे. 1954 मध्ये 308 लोकांकडे 4 हजार 600 एकर जमीन होती. पुढे 1957 मध्ये 2243 एकर जमिनीची नोंद कॉमन होती. 1959-60 मध्ये 78 शेतकर्‍यांकडे 1 हजार 148 एकर जमीन असल्याचे दिसून आले. मात्र सिलिंग कायदा आल्यानंतर 1961-62 मध्ये 186 उतार्‍यावर 1 हजार 576 एकर जमिनीची नोंद आढळून आली तर यानंतरच्या कालावधीत फक्त 11 लोकांकडे 73 एकर जमीन असल्याची नोंद दिसून आली.

उच्च् न्यायालयाच्या आदेशानुसार सहा महिन्यात काम पूर्ण करायचे आहे. त्यानुसार काम सुरू आहे. गेल्या 66 दिवसांमध्ये 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसर्‍या टप्प्यात केलेले काम संक्षिप्त रुपाने समोर आणायचे आहे. यासाठी प्रश्नावली तयार केली आहे. मुदतीत काम संपवून यातून जमिनीचे मूळ मालक कोण हा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न असणार आहे.’’ अशोक काकडे, अपर जिल्हाधिकारी.

सिलिंग अँक्टमुळे उतार्‍यांमध्ये खाडाखोड
सिलिंग अँक्टने माळीनगर कारखान्याच्या प्रशासन व तत्कालीन तलाठय़ांनी सन 1961-62 मध्ये 1 हजार 41 उतारे फाडून टाकली, 918 एकर उतार्‍यांच्या नोंदीमध्ये खाडाखोड करून बदल केला तर 1864 एकर उतार्‍यांची बनावट पाने जोडल्याचे समोर आले आहे. याशिवाय लावणचिठ्ठीमध्ये असलेल्या नावांमध्ये खाडाखोड करण्यात आले आहे.

या कागदपत्रांची करण्यात येत आहे तपासणी
सात-बारा उतारे, तुटलेल्या उसाची नोंदवही, भुसार पिकांची नोंदवही, माळीनगर साखर कारखान्याकडील बागायतदार खतावणी नोंदवही, कारखान्याकडील पाटबंधारे वसुली तक्ते, कारखान्याकडील इतिवृत्त नोंदवही, सर्वसाधारण सभा नोंदवही, लावण चिठ्ठी नोंदवही, पेमेंट व्हावचर, नांगरणी बिले या रजिस्टरची तपासणी करण्यात आली. याशिवाय कारखान्याने केलेल्या 1 हजार 174 ठरावाची तपासणी करण्यात आली.