आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीना नदीत पाणी सोडण्यासाठी तेरामैलला दीड तास रास्ता रोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर- सीना नदीत उजनीतून पाणी सोडावे या मागणीसाठी सोलापूर विजापूर महामार्गावरील बसवनगर तेरामैल चौकात शेतकर्‍यांनी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप शिवसेना व रिपाइंने पाठिंबा दिला. पाणी न सोडल्यास सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सीना नदी पाणी संघर्ष समितीने अध्यक्ष विलास लोकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य अप्पाराव कोरे, पंचायत समिती सदस्य अमर पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, शिवानंद वरशेट्टी, रमेश पाटील, शिवसेनेचे युवा नेते गणेश वानकर, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश शिंदे, महेश पाटील, अरविंद तुळशेट्टी, विद्यासागर मुलगे, राधाकृष्ण पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. या वेळी वरशेट्टी यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधी निश्चिंतच आहेत. त्यामुळेच सीनेत पाणी सोडले जात नाही. कोर्सेगावपर्यंत पाणी आलेच पाहिजे असे सांगत आमरण उपोषणाचा इशारा दिला. लोकरे यांनी सीना व भीमा नदीवर आणखी दोन बंधारे बांधावेत. कोर्सेगाव या शेवटच्या बंधार्‍यापासून सीनेत पाणी अडवले जावे. अन्यथा तीनही तालुक्यांतून आंदोलन होईल, असा इशारा दिला. यावेळी महेश पाटील, गायकवाड कनकर यांनी मनोगत व्यक्त केले. उजनी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कायर्कारी अभियंता जी. के. शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात सीना नदीत त्वरित पाणी सोडावे, सीना व भीमा नदीवर नवीन बंधारे बांधावेत. सीना नदीला कालव्याचा दर्जा मिळावा. सीनेत बारमाही पाणी सोडावे या मागण्या केल्या आहेत.
4 कि.मी. अंतरापर्यंत वाहनांची लागली रांग
सोलापूर-विजापूर व तेरामैल मंद्रूप या मार्गावरच्या चौकात दीड तास रास्तो रोको आंदोलन झाले. यामुळे या मार्गावरच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी रांग लागली होती. याचा फटका प्रवाशांना बसला.
25 जणांवर गुन्हा दाखल
मंद्रूपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश रासकर, फौजदार युवराज खाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंद्रूप पोलिसात प्रमुख नेत्यांसह 25 जणांवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले.
काँग्रेसने नेत्यांची गैरहजेरी
सीना नदीत पाणी सोडावे यासाठी नेहमी आवाज उठवणारे माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. हा चर्चेचा विषय होता.