सोलापूर- नासा या जगप्रसिद्ध अवकाश संशोधन केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या स्पेस कॅम्पमध्ये भारतातून तीन विज्ञान शिक्षकांची निवड झाली होती. त्यात सोलापूरच्या मयुरी देशपांडे - परिचारक यांचा समावेश होता. मयुरी यांच्या गौरवास्पद यशाची वसंतनगर येथील रहिवाशांनी दखल घेतली. माजी खासदार सुभाष देशमुख, उद्योजक ए. जी. पाटील, नारायण कुलकर्णी व ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर यांच्या उपस्थितीत जगदीश सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीनिवास देशपांडे, मयुरी यांचे वडील जगन्नाथ परिचारक, गोविंद काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नासाकडून यू. एस. स्पेस अँन्ड सेंटर स्टेट आलभाना सिटी हन्टसी व्हीले येथे आठ दिवसांचे स्पेस कॅम्प घेण्यात आला.
या प्रशिक्षणासाठी जगभरातून 200 विज्ञान शिक्षकांची व भारतातून 3 विज्ञान शिक्षकांची निवड दरवर्षी करण्यात येते. मयुरी देशपांडे यांनी नासामधील प्रशिक्षणाबाबतचे अनुभव यावेळी व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमात र्शी. देशमुख म्हणाले, ‘सोलापूरची कन्या नासाच्या खास प्रशिक्षणात सहभागी होते, ही बाब सर्वांसाठी अभिमानाचीच आहे. सोलापुरात खूप टॅलेंट आहे. या टॅलेंटचा विकासासाठी वापर होणे गरजेचे आहे. आहे ती परिस्थिती स्वीकारून सर्वजण झटून कामाला लागू, विकास निश्चित साधू शकेल.’