आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या नऊ महिन्यांत 35 मंगळसूत्र चोरीच्या घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरात चेन स्नॅचिंग घटना सातत्याने वाढत आहेत. दर दोन-चार दिवसाला एखादी घटना घडलेली असते. काही घटना तर पोलिस चौकी परिसरात घडलेल्या आहेत. यावरून चोरांना पोलिसांचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक महिला आज दहशतीखाली आहे. कुठून तरी एखादा मोटारसायकलस्वार येईल आणि गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेईल याची भीती त्यांना सतावत आहे. सुरक्षेची हमी नसल्याने एकटे घराबाहेर पडणे महिलांना मुश्किल बनले आहे. या घटनेतील पीडित महिलांच्या अनुभव जाणून घेण्याचा ‘दिव्य मराठी’ने केलेला प्रयत्न.

नऊ महिन्यांत 35 घटना
जानेवारी 2013 पासून आतापर्यंत सोलापूर शहराच्या विविध भागात 35 ठिकाणी मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या. त्यातील 13 घटनांचा तपास लागला आहे. काही महिलांना चोरीला गेलेले सर्व दागिने मिळाले, तर काही महिलांना थोडेच मिळाले. 22 घटनांचा तपास अद्याप सुरू आहे. शहरातील निर्मनुष्य ठिकाणी महिलांना गाठून त्यांच्या गळ्याला हिसका देऊन चोरटे हे प्रकार करत असल्याचे महिलांच्या अनुभवातून पुढे आले.

विजापूर रोड संवेदशील भाग
जुळे सोलापूर व विजापूर रोडवरील निर्मनुष्य ठिकाणी मंगळसूत्र हिसकावून नेण्याचे प्रकार अधिक असल्याचे मागील घटनांवरून दिसते. रहदारी नसलेल्या भागात अनेकदा अशा घटना घडल्या असल्यातरी पोलिस प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. पोलिसांकडून ठोस उपाययोजना राबवण्याबाबत असलेल्या उदासीनतेमुळे चोरांचेही धाडस वाढत आहे. 40 टक् के घटना या भागातच घडल्या आहेत.

पोलिसांना नाही गांभीर्य
नोकरी तसेच व्यायामासाठी घराबाहेर पडणार्‍या महिलांचे प्रमाण अधिक आहेत. अंतर्गत रस्त्यावर रहदारी कमी असते. चोरटे महिलांना एकटे गाठतात काही वेळेस जोडपे असल्यास पुढे दंगल सुरूआहे. तुम्ही दागिने काढून ठेवा, असे बहाणा करीत दागिने चोरले जातात. मोटारसायकलवरील महिलांनाही लक्ष केले जाते. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटना वाढत असताना पोलिस मात्र गप्प आहेत.

सप्टेंबर महिन्यात घडल्या चोरीच्या तीन घटना
सप्टेंबर महिन्यात लागोपाठ तीन मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत. विद्या अक्कलकोटे या महिलेला दुचाकीने धडक दिली. अचानक घडलेल्या प्रसंगातून सावरेपर्यंत मोटारसायकलवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे मंगळसूत्र व एक तोळ्याचे लॉकेट हिसकावून नेले. निर्मनुष्य ठिकाणी रात्री दहा वाजता घडलेल्या या घटनेत अक्कलकोटे यांना कुणाचीही मदत मिळाली नाही. दुसर्‍या घटनेत संध्याकाळी बसस्थानकासमोर थांबलेल्या सुवर्णा क्षीरसागर यांचे मंगळसूत्र मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. तिसर्‍या घटनेत संध्याकाळी सग्गमनगर येथे पायी चालत जाणार्‍या अर्चना तिकोटे यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र ओढून नेले. रहदारी असलेल्या ठिकाणी मोटारसायकलवरून जाणार्‍या महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नाकाबंदीचा पर्याय
मंगळसूत्र चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन माजी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी विजापूर रोड व जुळे सोलापूर येथे 16 ठिकाणी नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे सायंकाळी 5 ते 9 या वेळेत अंतर्गत रस्त्यांवर नाकाबंदी केली जात होती. नाकाबंदी काळात चोरीच्या घटनांना आळा बसला होता. या वर्षभरात अशा घटना पुन्हा वाढल्याचे दिसत आहे.

महिलांनी सतर्क राहावे
वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची कुमक कमी आहे. शिवाय एकाच वेळी विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू असल्याने बंदोबस्तासाठी पोलिस गुंतलेले असतात. त्यामुळे अशा घटनांना आळा घालणे शक्य नाही. त्यासाठी महिलांनी त्यांच्या स्तरावर सतर्क राहणे हा उपाय आहे. सकाळी गुड मॉर्निंग पथक आहे, शिवाय दोन-तीन दिवसांआड संध्याकाळची गस्त आहे. नितिन कौसडीकर, गुन्हे शाखा निरिक्षक

वारंवार फोन करूनही पोलिसांचे नाही सहकार्य
शिवगंगानगर येथे राहणार्‍या बहिणीच्या मुलीच्या साखरपुडयासाठी सोलापुरात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर डी-मार्ट येथे खरेदीसाठी चाललो होतो. आमच्या समोरून आलेल्या माणसाने मागून माझ्या गळ्याला जोरात झटका दिला. क्षणभर काहीच कळले नाही. भानावर येईपर्यंत गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र गायब झाले होते. पुण्याला असल्याने वारंवार पोलिस स्टेशनला फोन करावा लागतो. सोने मिळेल याची शाश्वती नाही. महानंदा लोणी, पीडित, पुणे

तीन महिने झाले तरी चोरीचा शोध नाहीच
सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. घराजवळ काही आंतरावर चालत आल्यानंतर पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील चोरट्यांनी काही कळण्याच्या आत मंगळसूत्र हिसकावून नेले. तीन तोळ्यांचे मंगळसूत्र होते. या घटनेला तीन महिने झाले. पण चोरटे पकडले गेले नाहीत. पोलिसांचाही काही प्रतिसाद नाही. तक्रार नोंदवल्यानंतर फक्त एकदा फोन आला होता. तपास केला जात आहे का माहीत नाही. आता हेलपाटे मारणे होत नाही म्हणून नाद सोडला आहे. अलका भोसले, पीडीत महिला, संतोषनगर

सतर्क राहूनच महिलांनी स्वत:चा बचाव करावा
सकाळी घराजवळून जात असताना अचानक एकाने मागच्या बाजूने माझ्या मंगळसूत्राला हात घातला त्या प्रकराने मी गांगरले मात्र मी हलले नाही. मी त्याच्याशी झटापट केली आणि आरडाओरडा केला. त्यावेळी शेजारचे सगळेजण मदतीला धावले. चोराला पकडण्यात आम्हाला यश आले. पण, त्या प्रकारामुळे आजही खूप भीती वाटते. असे संकट कोणावरही येऊ नये असे वाटते. यातून एक धडा मिळाला आहे की सतर्क राहणे गरजेचे आहे. श्रीजा गुंडला, कर्णिकनगर

थेट सवाल : प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त सोलापूर शहर
प्रश्न : सोलापूर शहरात मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर आळा कसा घालणार?
उत्तर : ईझी क्राइम असल्याने त्याचे प्रमाण वाढले आहे. बीट मार्शल (नाकाबंदी) आहे.
प्रश्न : नाकाबंदी थंडावल्याचे कारण काय?
उत्तर : शहरात उत्सवाचे प्रमाण अधिक आहे. त्यात कर्मचारी गुंतले जातात जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही नाकाबंदी ठेवतोच. मात्र तुम्हाला रोजच अपेक्षित असेल तर ते उत्सवावर अवलंबून आहे.
प्रश्न : तेच गुन्हेगार पुन्हा पुन्हा गुन्हा करतात, की नवीन गुन्हेगार असतात ?
उत्तर : दोन्ही प्रकार आहेत. यात प्रामुख्याने महिलांनी सतर्क राहावे त्यांनी विरळ वस्तीतून जाताना आपल्या सोबत कुणीतरी न्यावे. अथवा अशावेळी सोन्याचे दागिने घालून जाणे टाळावे.