आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने हिसकावले अन् दुचाकीवरून पळाले, 15 तोळे दागिने लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अक्कलकोट रस्त्यावरील व्हीवको प्रोसेजवळ गुरुवारी रात्री महिलेच्या गळ्यातील 15 तोळे दागिने हिसकावून नेण्यात आले. बुधवारी पंधे अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षकाला कोंडून पैसे, दुचाकी चोरून नेली होती, तर गुरुवारी माजी महापौर भीमराव जाधव गुरुजी यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यात 65 तोळे सोने, साडेचार लाखांची रोकड गेली होती. या घटना पाहता सोलापुरात पोलिस यंत्रणा आहे की नाही, अशी शंका येत आहे.
मीनाक्षी मधुकर अल्ले (रा. न्यू पाच्छापेठ, अशोक चौक) या मुलासोबत दुचाकीवरून जात होत्या. पाठीमागून एक तरुण पळत आला आणि चपलाहार, सोन्याचे गंठण हिसकावून पळला. काही अंतरावर दुचाकीवर थांबलेल्या मित्रासोबत तो पळून गेला. ही घटना गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमाराला व्हीवको प्रोसेस चौकात घडली. शुक्रवारी पोलिसांनी फिर्याद नोंदली आहे. दागिन्यांची किंमत चार लाखांच्या घरात जाते. चोरांनी नवा फंडा वापरला आहे. एरवी दुचाकीवर बसूनच मंगळसूत्र हिसकावण्यात येते. यात दागिने चोरण्यासाठी दुचाकीचा पाठलाग करत तरुण गेला. दागिने घेतल्यानंतर काही अंतरावर थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर पळून गेला. साहाय्यक पोलिस निरीक्षक अरुणा जगताप तपास करीत आहेत.
महिलेला जीवे मारण्याची धमकी
जागेच्या कारणावरून रशिदा मश्जिद शेख (वय 56, रा. रेल्वे लाइन, सोलापूर) यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. परवेज मजीद शेख, सीमरन परवेज शेख (रा. दोघे रेल्वे लाइन) यांच्यावर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जागेच्या वाटणीवरून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
ट्रकच्या धडकेत दोन तरुण जखमी
ट्रकच्या (एपी 24 टीए 6088) धडकेत स्वप्नील हणमंत घुले (वय 27, रा. दमाणीनगर) व त्याचा भाऊ नितीन दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री देगाव टोलनाक्याजवळ घडला. जखमींवर उपचार सुरू आहे. शुक्रवारी पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी व ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला.
सिद्धेश्वर मंदिरात विजेचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू
सिद्धेश्वर मंदिरात विजेचा खांबावर चढून काम करताना शॉक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमाराला घडली. लक्ष्मण तानाप्पा माळी (वय 40, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला. माळी हा खांबावर चढून काम करीत होता. शॉक बसल्यामुळे खाली पडला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. माळी यांच्या मागे पत्नी, आई, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
अपघातात पोलिसाचा मृत्यू
पुणे रस्त्यावरील हॉटेल निसर्गजवळ दुचाकीवरून सोलापूरकडे येताना समोरून येणार्‍या दुचाकीची धडक बसल्यामुळे रामदास भगवान माळी (वय 52, रा. कवितानगर पोलिस लाइन, सोलापूर) या पोलिसाचा मृत्यू झाला. ते ग्रामीण पोलिस मुख्यालयात काम करीत होते. कोंडी शिवारात त्यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी होती. काम आटोपून घराकडे येताना गुरुवारी रात्री नऊच्या सुमाराला कोंडीजवळील निसर्ग ढाब्याजवळ समोरून येणार्‍या दुचाकीची धडक बसल्यामुळे ते जखमी झाले होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. सोलापूर तालुका पोलिसात या घटनेची नोंद आहे.
रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
धावत्या रेल्वेची धडक बसून शिवप्रसाद लक्ष्मण जोडमोटे (वय 25, रा. न्यू पाच्छापेठ, सोलापूर) या तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी चारच्या सुमाराला कंबर तलावाजवळ घडली. रेल्वे पोलिसात याची नोंद आहे.