आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chairman Of The Meeting Of Theatrical Arun Kakade Speaking About Backstage Actor

बॅकस्टेज कलावंतांना आधार देण्याचा प्रयत्न, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांचा मनोदय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रंगमंचावरून कलावंत अभिव्यक्त होताना श्रोत्यांना अनुभवता येतो. प्रत्यक्ष कलाकृती प्रभावीपणे लोकांसमोर सादर करण्यासाठी पडद्याआडून प्रकाश योजनेसह नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा अशी जबाबदारी पेलणार्‍या अनेकांचे साहाय्य असते. परंतु बॅकस्टेज कलावंतांना कलावंत म्हणून स्थान मिळत नाही हे खरे आहे. त्यांनाही कलावंत म्हणून उभे कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय 94 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

अनेक वर्षांपासून रंगभूमीच्या सेवा बजावत असल्याने मला बॅकस्टेज कलावंतांचे नेमके दुखणे माहीत आहे. यापूर्वीच्या अध्यक्षांनी अशा कलावंतांसमोर असलेल्या अडचणींचा ऊहापोह केला आहे. आपण प्रत्यक्ष प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. पुणे, मुंबईच्या बाहेर नाटक का जात नाही ? याची कारणे अनेक आहेत. कारणे सांगण्यापेक्षा त्यावर उपायांची माझ्या परीने सोडणूक करणार आहे. प्रयोगांसाठी रात्रंदिवस झटणार्‍या तंत्रज्ञांना काही अपघात झाला, काही त्रास झाला तर त्यांना त्यांच्या तोकड्या पैशात काही न करता दु:ख सहन करावे लागते. मात्र आता नाट्य परिषद आणि शासनाच्या वतीने मदतीची तरतूद करणार आहे.

कलावंतांसाठी करार महत्त्वाचा
नाट्य निर्माता संघ आणि तंत्रज्ञ यांच्यातील करार वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय पडद्यामागच्या तंत्रज्ञांना पेन्शन मिळवून देता येईल का? तसा प्रयत्न करणार आहे. ज्या प्रयोगातून आजही तंत्रज्ञांना मिळणारा मूलाहिजा मिळतो तो उत्तम मिळावा यासाठी काही तरतूद करू, अशी भावना काकडे यांनी व्यक्त केली.

संमेलन प्रत्येकांची ओंजळ भरेल
संमेलनासाठी उभा महाराष्ट्र उत्सुक आहे. त्याप्रमाणे मीही आहे. सर्व कलावंत रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा. त्यातून प्रत्येकांची ओंजळ भरणारच आहे. त्यात कुणी काय, कसे घ्यायचे हे ज्याच्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. मात्र हा उत्सव आहे, हे लक्षात घ्यावे, त्याचा आनंद लुटावा, असे वाटते.

मी तर साधा खेडूत
नीरा नृसिंहपूर या छोट्या गावचा मी. मात्र कामाची आणि व्यवस्थापनाची आवड होती. नाटकांच्या काही पिढय़ांना झगडताना पाहिले आहे. मला नाटकाचे वेड लागले ते वाडिया महाविद्यालयात असताना. माझ्यावर अत्रे आणि भालबा केळकर यांच्या नाटकांनी प्रभाव पाडला. त्यामुळे नाटकांकडे समरसतेने पाहू लागलो. 1955 पासून प्रोग्रेसिव्ह डॅरॅमॅटिक असोसिएशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1956 मध्ये मुंबई गाठली. रंगायतन आणि आविष्कार संस्थांमुळे नाटकांचा प्रवास सुखद झाला. अभिनयाऐवजी नाटकांचे खंबीर तंबू करणे जास्त आवडले.