आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Challenges Before The Parties Pawar, Shinde Not Standing For Loksabha Election

लोकसभेसाठी पवार, शिंदें यांच्या ‘ना’मुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर उमेदवारीचा पेच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आगामी लोकसभा 2014 ची निवडणूक लढवणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लातुरात परवा सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी यापूर्वीच निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षांसमोर ‘तगड्या’ व पक्षांतर्गत सर्वमान्य असलेल्या उमेदवारीचा पेच आहेच. वेगवेगळय़ा चर्चांमुळे राजकारण ढवळून निघाले आहे.

सोलापूर आणि माढा या दोनही मतदार संघात दमदार उमेदवार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2009 मध्ये सहज निवडणूक जिंकता आली. या वेळी तसे ‘तगडे’ उमेदवार नसतील तर अडचणी आहेत, असे दोनही पक्षातले नेते, कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. दोनही पक्षात ‘साहेब’ तुम्ही उभे राहा, असा आग्रह येत्या काळात धरला जाऊ शकतो.

एकीकडे श्री. शिंदे यांना पर्याय ठरेल असा मातब्बर उमेदवार काँग्रेसकडे असल्याचे सध्या तरी दिसत नाही. 2004 च्या लोकसभा मतदानानंतरच्या पत्रकार परिषदेत श्री. शिंदे यांनी निवडणूक लढविणार नाही असे जाहीर केलेच होते. त्यानंतर ते राज्यसभेवर गेले. नंतर लोकसभेतून निवडून आले. यापूर्वीही दोन वेळा शिंदे यांनी ‘नाही, नाही’ म्हणत निवडणुकीचा गड सर केला. दुसरीकडे नवी दिल्लीत काँग्रेस हायकमांडला केंद्रात सरकार स्थापण्यासाठी अनुभवी, ज्येष्ठ आणि आपले ऐकणार्‍या नेत्यांची वानवा जाणवत आहे. अलीकडे लोकांचा कल जाणून घेणार्‍या सगळ्या चाचण्यांमधून काँग्रेसला बहुमत मिळेल किंवा संयुक्त पुरोगामी आघाडीची सरशी होईल असे सांगत नाहीत. अशा पडत्या स्थितीत हमखास निवडून येणार्‍यांचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर साहजिकच होणार. सोलापूर लोकसभा मतदार संघ श्री. शिंदे यांच्यामुळे काँग्रेसला सहज राखता येणार आहे. त्यामुळे वरूनही त्यांना उमेदवारीसाठी आग्रह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानणार्‍यांपैकी श्री. शिंदे आहेत. त्यामुळे नको नको म्हणत निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्याची त्यांची शक्यता जास्त आहे. तसेच त्यांचे ‘नाही’ वक्तव्य गांभीर्याने न घेण्याचाही कल आहे. तो राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो. देशभरात काँग्रेसला मोठी टक्कर द्यावी लागणार आहे, त्यामुळे सर्व प्रमुख नेते मैदानात दिसतील, असे पक्षातून सांगितले जात आहे. ‘सुशीलकुमार तुम्ही मैदानात या’ अशी हाक नामदेव ढसाळ यांनी आपल्या एका लेखातून दिली आहे, हे विशेष असल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे.


श्री. पवार यांनीही यापूर्वीची निवडणूक न लढण्याचे जाहीर केले होते. मात्र, ‘पक्षाचा’ आदेश असल्यामुळे मजल दरमजल करत ते माढा मतदार संघाच्या मुक्कामी आले. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सध्या तरी देशातील वातावरण अतिशय वेगळ्या पद्धतीचे दिसत आहे. केंद्र सरकार स्थापण्यात मोठी उलथापालथ घडू शकेल अशी स्थिती निर्माण होणार असल्याचे आडाखे जाणकारांकडून बांधले जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा श्री. पवार ‘पक्षा’चा आदेश मानत निवडणुकीत उभे राहातील. पण, ते ठामच राहिले तर त्याच्या माढा लोकसभा मतदार संघातून राजकीय संघर्षाची चिन्हे अधिक आहेत. पवारांचा वारसदार कोण यावरूनच वेगवेगळी चर्चा आतापासून रंगली आहे.

फलटणमधून रामराजे निंबाळकर यांनी ‘आपण माढय़ासाठी इच्छूक आहोत’ असे जाहीर केले आहे. तर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ही निवडणूक लढवावी असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होण्याची चिन्हे आहेत. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचेही नाव चर्चेत आणले जात आहे. ‘कृष्णा-भीमा’ स्थिरीकरणाच्या लढय़ामुळे विधानसभेला कोण अन् लोकसभेला कोण याचे वेगवेगळे आडाखे बांधले जात असल्याने लोकसभेची निवडणूक पवार नसतील तर खूपच रंगणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तेथून तगडा उमेदवारच द्यावा लागणार आहे. गेल्या चार-पाच वर्षांत मोहिते-पाटील आणि अजित पवार सर्मथकांत जो राजकीय आखाडा रंगला आहे, तो पाहता स्थानिक नेते खूपच सावधपणे बोलत आहेत. दोन्ही पक्षातील ही स्थिती पाहता सोलापूर, माढय़ातून ‘दोनही वरिष्ठ’ नेते पुन्हा एकदा मैदानात उतरलेले दिसतील का? या बाबतची उत्सुकता लागून राहिली आहे. त्याबाबतचे चित्र येत्या दिवाळीनंतर स्पष्ट होईलच.


गुलदस्त्यातली उमेदवारी
पवार, शिंदे, बनसोडे, आठवले, सुभाष देशमुख हे सगळेच नेते गुलदस्त्यातील उमेदवार असेच आज बोलले जात आहे. जसजसे निवडणुकीचे ढग जमायला लागतील तसतसे चित्र अधिक स्पष्ट व्हायला लागेल. तोपर्यंत सर्वच राजकीय पक्ष अन् नेतेही स्वत: ‘एक्स्पोज’ व्हायला तयार नाहीत. शिंदे अन् पवार नसतील तर त्यांना सोलापूर आणि माढ्यातून खूप मोठ्या ताकदीने उमेदवारांच्या पाठीशी लागेल हेही तेवढेच खरे.