आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेंबर निवडणूक: सुरवसेंनी मारलेल्या उडीवर विकास पॅनेल व व्यापारी महासंघात कलगीतुरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जहाजातून उंदीर मारतात उडी..
सोलापूर- सोलापूर चेंबर ऑफ कॉर्मसचे उपाध्यक्ष दत्ता सुरवसे यांनी व्यापारी महासंघाच्या ‘एलबीटी हटाव पॅनेल’मध्ये जाणे म्हणजे जहाजातून उडी मारणार्‍या उंदरासारखे आहे. चेंबरने सोलापूरच्या उद्योग-व्यापारवाढीत मोठी भूमिका बजावली. ‘एलबीटी’विरोधात ठाम भूमिका घेतली. उलट व्यापारी महासंघाने व्यापार्‍यांची दिशाभूल करून एलबीटीचा मोठा बोजा वाढवून ठेवला, अशी टीका ‘चेंबर विकास पॅनेल’च्या प्रमुखांनी मंगळवारी केली.

चेंबरचे अध्यक्ष तम्मा गंभिरे, मानद सचिव केतन शहा, उपाध्यक्ष कुमार करजगी, नरेंद्र गंभिरे, तुकाराम काळे, बाबूराव घुगे, बशीर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन चेंबरची भूमिका मांडली. महासंघाचा आडमुठेपणाच या निवडणुकीला कारणीभूत आहे. आम्ही स्वत:हून 12 जागा मागितल्या. त्यांनी नाकारल्या. त्यामुळे निवडणूक लागली. एलबीटीच्या विषयावरून महासंघाची निर्मिती झाली. त्यांचा संघर्ष दिशाहीन झाला. 78 कोटी रुपयांची वार्षिक एलबीटी 200 कोटी रुपयांवर जाऊन भिडली. त्यानंतर ‘शहर विकास कर’ म्हणून पैसे भरण्यास सांगितले. व्यापार्‍यांची ही दिशाभूल, फसवणूक आहे. महासंघाचा खरा चेहरा दाखवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठीच रिंगणात उतरलो, मतदार दिशाभूल करणार्‍यांना धडा शिकवतील, असे पॅनेलप्रमुखांनी सांगितले.

बुडणार्‍या जहाजेत थांबेल कोण

सोलापूर- चेंबर ऑफ कॉर्मस म्हणजे फुटके जहाज आहे. ते आता बुडायलाच आलेले असताना, त्यात बसणार कोण? गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी उद्योग-व्यापारवाढीच्या गप्पा मारू नयेत, असा सल्ला व्यापारी महासंघाच्या ‘एलबीटी हटाव पॅनेल’चे प्रमुख प्रभाकर वनकुद्रे यांनी दिला. चेंबरच्या प्रत्येक आरोपाचे खंडन करताना त्यांनी, पदाधिकार्‍यांच्या भूमिकेची झाडाझडती घेतली.

उद्योगपती दत्ता सुरवसे यांनी ही निवडणूक अविरोध होण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला; परंतु चेंबरच्या काही हटवादी प्रवृत्तींनी ही निवडणूक लादली. निवडणुकीला सामोरे जाताना, चेंबरला संपूर्ण पॅनेलसाठी उमेदवार मिळाले नाहीत. ही नामुष्कीच त्यांच्या बुडत्या जहाजाची साक्ष आहे. जे त्या जहाजात बसलेले आहेत, त्यांनी स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहावे. असा जोरदार टोला र्शी. वनकुद्रे यांनी लगावला.

महासंघाने एलबीटी हटाव चळवळ सुरू केली. त्याला राज्यभरात मूर्तस्वरूप आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या पटलावर पोचले. परंतु, चेंबरने या चळवळीत सातत्याने खो घालण्याचा प्रयत्न केला. त्याला न जुमानता व्यापारी महासंघात एकवटले. त्यांची ताकद या निवडणुकीत दिसून येईल.