आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Gudewar New Municipal Commissioner Solapur

शहरात सुशासन अन् विश्वासार्हता देऊ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुशासन आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. नागरी सेवांमध्ये किमान 80 टक्के तरी या गोष्टींचा समावेश असावा. रस्ते, पाणी, वीज, गटारी या मूलभूत सुविधा याच तत्त्वाने मिळणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल तर व्यवस्था कुठे तरी चुकत असल्याचे समजावे. ही व्यवस्था नीट बसवण्याचे काम करू आणि सोलापूरकरांना सुशासन आणि विश्वास देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. सकाळी पदाची सूत्रे घेतली. त्यानंतर ते बोलत होते.

मी भाषण करत नाही किंवा गप्पा मारत नाही. सोलापूर शहर मला नवखे आहे. येथील नागरी प्रश्नांची जाण होण्यासाठी एक-दोन महिने लागतील. त्यानंतर माझ्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. तेव्हा मात्र ‘काही तरी करतोय हा माणूस..’ असे सामान्यांना निश्चितच वाटेल. यापूर्वी ज्या ठिकाणी काम केले, तिथेही अशीच शैली वापरली. त्याचे झाले असे, की वाईटांचा बीमोड करण्याच्या कामाला जादा प्रसिद्धी मिळाली आणि लोक वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे पाहू लागले. एकूणच नागरी सेवेतील अधिकार्‍यांना महत्त्व मिळत आहे; जी अनावश्यक आहे. अधिकारातील कामे करताना त्याचा योग्य परतावा नागरिकांना मिळावा, एवढाच उद्देश असतो. अधिकारांच्या बाहेर जाऊन काहीच करत नाही. त्यामुळे अशा अधिकार्‍यांना महत्त्व नको, असेही श्री. गुडेवार यांनी नम्रपणे नमूद केले.

सहाय्यक आयुक्त पंकज जावळे, अजित खंदारे, नगर अभियंता सुभाष सावस्कर, विविध खात्यांचे प्रमुख आणि कर्मचार्‍यांनी श्री. गुडेवार यांचे स्वागत केले. दुपारी दोनला दिल्लीला रवाना झाले. शनिवारी (ता. 8) ते पुन्हा सोलापुरात आहेत.

इंटरेस्ट तिथे संघर्ष
महापालिकांच्या कारभारात संघर्ष असतो; परंतु माझ्या निरीक्षणातून असे दिसून आले, की जिथे इंटरेस्ट असतो तिथेच संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे अशा संघर्षांना कसे पाहायचे आणि कसे संपवायचे हे त्या विषयानुरूप ठरवावे लागते. सोलापूरकरांना देण्यासाठी काही निश्चित ठरवलेले नाही. परंतु सिस्टिमने काम करायचे, हे मात्र निश्चित ठरवलेले आहे. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त महापालिका

गेडामसाहेब अन् मी..
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द गाजवणारे डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कर्तव्यकठोर भूमिका घेणारे गुडेवार सोलापूरला आले. तुम्ही दोघे ठरवून आलात की काय.? या प्रश्नावर हसून गुडेवार म्हणाले, ‘‘आम्हा दोघांची कार्यशैली एकच आहे. त्याला प्रसिद्धीही तशी मिळते. परंतु सोलापूरला येण्याबाबत दोघांनीही तसे काहीही ठरवलेले नाही. गेडामसाहेब, साहेबच आहेत. आणि मी..तुम्ही माझे काम पाहूनच ठरवा,’’ असे श्री. गुडेवार यांनी नम्रपणे नमूद केले.