आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrakant Gudewar New Municipal Commissioner Solapur

चांगले काम सत्तर टक्के कर्मचार्‍यांवरच; ‘साहेबां’ना द्यावी लागते सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कुठल्याही शासकीय कार्यालयात 70 टक्के कर्मचारी ‘साहेब करतात म्हणून..’ इतर ‘उद्योग’ करतात. उर्वरित 30 टक्क्यांमध्ये 15 टक्के कारवाईने सुधारतात. राहिलेले 15 टक्के मात्र ब्रह्मदेव आला तरी सुधारणे शक्य नसते. ही गणिते समोर ठेवूनच 70 टक्के कर्मचार्‍यांच्या ‘साहेबां’ना व्यवस्थेने काम करण्याची सूचना द्यावी लागते. उर्वरितांवर कायदेशीर कारवाई करताना कठोर व्हावेच लागते, अशी गणिते महापालिकेचे नवे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मांडली.

गुरुवारी सकाळी साडेअकराला त्यांचे ‘इंद्रभुवन’मध्ये आगमन झाले. पदभार घेतल्यानंतर उपायुक्तांकडून त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला.

महापालिकेत प्रचंड घोटाळे, गैरव्यवहार होतात. प्रशासन मात्र हलत नाही. अशा विस्कटलेल्या व्यवस्थेला सुधारणारा चांगला अधिकारी आला तरी नेतेगण टिकू देत नाहीत. अशा आव्हानांना समोरे जाताना आपण काय करणार? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, ‘‘सरकारी कार्यालयांमध्ये 70 टक्के कर्मचार्‍यांवरच चांगला कारभार अवलंबून आहे. त्यांना घेऊनच सुशासन देणे शक्य आहे. नेतेगण म्हणाल तर ते करून करून काय करतील? बदलीच ना. मला स्वर्गात पाठवले तरी काम करायचे आहे अन् नरकात पाठवले तरी कामच करायचे आहे. त्याची बिलकुल पर्वा करणार नाही. चांगल्या कामाच्या आड येणार्‍या कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही.’’

.. म्हणजे तुमच्याकडे ताज्या भाज्या येतात?
श्री. गुडेवार यांचे स्वागत करण्यासाठी महापालिकेतील खातेप्रमुखांची सकाळी रांग लागली होती. प्रत्येकाचे स्वागत स्वीकारत त्यांचा परिचय करून घेत होते. कामे घेणारे कंत्राटदार आले. त्यांचा बुके घेऊन हसतच विचारले, ‘‘काय बिले मिळताहेत ना?’’ त्यावर कंत्राटदार म्हणाले, ‘‘नाही साहेब. त्यासाठी तर..’’ हो हो कळलं कळलं. म्हणत त्यांना पाठवले. त्यानंतर उपायुक्त अजित खंदारे यांनी, आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकार्‍यांना घेऊन आले. त्यांचा परिचय करून देतानाच, श्री. गुडेवार म्हणाले, ‘‘तुम्ही, उस्मानाबादला होता ना.’’ दोन वर्षांपूर्वीची आठवण सांगताच ते अधिकारी भारावून गेले. त्यानंतर महापालिका मंडई विभागाचे अधीक्षक आले. त्यांचा परिचय मधूनच तोडत गुडेवार म्हणाले, ‘‘म्हणजे तुमच्याकडे रोज ताज्या भाज्या येतात.’’ त्यांच्या या वाक्याने तो अधिकारी क्षणभर गोंधळून गेला. नंतर गुडेवारांच्या हसण्याने तोही त्यात सहभागी झाला.