आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Changes In The Fifth Standard Syllabus Since The Next Academic Year

पाचवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे झाले कमी, होणार नियमीत मूल्यमापन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. तीन विषयांच्या पुस्तकांना एकत्र करून एकच पुस्तक तयार केले आहे. पूर्वी आठ विषयांची आठ पुस्तके घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत होते. यंदा या नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पालक आणि शिक्षकांत चर्चेला सुरुवात झाली. नवे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतल्या काही शाळांना भेटी देऊन वर्गातच दफ्तराचे वजन मोजले. एकेक दप्तर साधारण १२ ते १६ किलोपर्यंत मोजले गेले. ते वाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे वजन होते फक्त २५ ते ३० किलो. हे समीकरण विद्यार्थी आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यावर तातडीने उपाय आवश्यक असल्याचा निष्कर्ष त्या वेळी काढण्यात आला.

त्यानुसार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी नवीन अभ्यासक्रमाची आखणी झाली. त्यात संपूर्ण अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पूर्वी सहा महिन्याला अथवा वर्षाला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक इतर मूल्यमापन होत होते. आता नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचे नियमित मूल्यमापन होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास करून त्या समस्या सोडवण्याचा विचार होईल.
अभ्यासक्रमामध्ये काय झाला नेमका बदल?
१. विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांचा एकाच पुस्तकात समावेश.
२. आता इतिहास विषयाला ‘परिसर अभ्यास-२’ असे नाव दिले आहे.
३. इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई पॅटर्नप्रमाणे नव्या पुस्तकांची रचना केली.
४. पुढील वर्षी ६व्या ७वीच्या अभ्यास-क्रमात अशाच पद्धतीचे बदल दिसतील.
जबाबदारी वाढली
शिकवण्याची पद्धत कशी असावी, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आता अधिक वाढली. पुस्तके बदलले तरी त्याचा प्रभाव शिक्षकांवरच अवलंबून राहतो.”
- प्रशांत देशपांडे, शिक्षक, कुचन प्रशाला
शिक्षणाची गोडी वाढेल
नव्या अभ्यासक्रमामुळे दप्तराचे ओझे कमी होईल. शिकवण्याची नवीन पद्धतही उत्कृष्ट आहे. त्याचे प्रशिक्षण नुकतेच झाले. ज्ञानरचनावादी शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांत गोडी वाढेल.”
- आशुतोष शहा, मुख्याध्यापक जैन गुरुकुल