आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमधील धर्मादाय जागेवरील अतिक्रमण हटता हटेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - धर्मादाय उपायुक्तांसह तीन सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची पदे सोलापूरला मिळाली. स्वतंत्र कार्यालयासाठी राज्य शासनाने गुरुनानक चौकातील 30 हजार चौरस फूट जागा विनामोबदला दिली. इमारतीसाठी विधी आणि न्याय खात्याने पाच कोटी रुपये दिले. परंतु या जागेवरील अतिक्रमण हटत नाही. ते हटवण्याचे काम उत्तर सोलापूरच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडे सोपवण्यात आले. फौजफाट्यासह त्या दोनवेळा जागेवर गेल्या. परंतु हात हलवत परत आल्या. अतिक्रमणवाल्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळूनही अतिक्रमण हटत नसल्याने वकील मंडळींनी संताप व्यक्त केला. मंजूर पदांवरील अधिकारी पुढच्या महिन्यात येतील. बसतील कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

गुरुनानक चौकात (सिटी सर्वे क्रमांक 631 अ पैकी 622) जुन्या पोलिस आयुक्त कार्यालयाला लागून असलेल्या जागेत टपरीधारकांचे अतिक्रमण आहे. जागा सोडण्याबाबत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांचा दावा फेटाळून लावण्यात आला. निकालाच्या प्रती मिळाल्यानंतर कारवाई करू, असे तहसीलदार मरोड म्हणाल्या होत्या. परंतु त्यांनी अद्याप कारवाई केली नाही, असे ट्रस्ट ऑफ प्रॅक्टीशनर्स असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ अँडव्होकेटस् प्रॅक्टिसिंग बिफोर कमिशनर्स ऑफ महाराष्ट्र या वकिलांच्या संघटनेने म्हटले आहे. याबाबतची निवेदने त्यांनी जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्याकडे दिली.


मागे का हटताय?
अतिक्रमण हटवण्यात काही नगरसेवकांचा अडसर असल्याची माहिती मिळाली. तसे असल्यास त्यांचे पद जाऊ शकते. तशी कायद्यातच तरतूद आहे. परंतु तहसीलदार मरोड मागे का हटत आहेत कळत नाही? आता जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनीच पुढाकार घ्यावा.’’ अँड. नितीन हबीब, सचिव, ट्रस्ट अँक्ट प्रॅक्टिशनर्स असो.


जिल्हाधिकार्‍यांशी बोलले!
अतिक्रमण हटवण्यातील अडचणींबाबत जिल्हाधिकार्‍यांशी बोलले. त्यांनी याबाबत संबंधित खातेप्रमुखांची बैठक घेऊन कारवाईचा निश्चित आराखडा तयार करणार असल्याचे सांगितले. वकील संघटना जे बोलत आहे, तसे काहीही नाही.’’ अंजली मरोड, उत्तर सोलापूर तहसीलदार


समन्वयातून कारवाई करू
कारवाई करण्याबाबत विविध विभागांच्या प्रमुखांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. संबंधित खातेप्रमुखांची बैठक घेऊन समन्वयानेच पथक तयार करता येईल. त्यानंतरच जागा अतिक्रमणमुक्त करता येईल. लवकरच याबाबतची कारवाई होईल.’’ डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी