आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chatrapati Sambhaji Maharaj News In Divya Marathi

संभाजीराजांची काव्यप्रतिभा आता मराठीतही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृतमधून लिहिलेल्या ‘बुधभूषण’ या काव्यग्रंथातील काही कवितांचे मराठीत भाषांतर झाले असून ते लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि साहित्यिक शरद गोरे हे यावर काम करत आहेत. या काव्यसंग्रहातील निवडक 110 कवितांचे ते मराठीत भाषांतर करत आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याच्या अनेक कथा आहेत, पण ते विद्वान साहित्यिकही होते, याची अनेकांना माहिती नाही. त्यांचे संस्कृ त आणि व्रज भाषेतील लेखन अद्यापही वाचकांपर्यंत पोहोचलेले नाही. बुधभूषण या काव्यग्रंथात राज्यशास्त्र, मानसशास्त्र, व्यापार व्यवस्थापन, व्यक्तीमत्त्व विकास आणि मानवी संसाधन यांची प्रचिती येते.

शरद गोरे यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम पुणे-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होतात. त्यांचे चार काव्यसंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. ते मूळचे माढातील उपळाई बुद्रुक गावचे आहेत. सोलापूरमध्ये दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तीनदिवसीय साहित्य संमेलन भरले होते. हे त्यांच्याच प्रयत्नातुन शक्य झाले, असे मसाप सोलापूर शाखा अध्यक्ष कवी देवेंद्र औटी यांनी दिली.

संभाजीराजांच्या काव्यात लोकशाहीचे सूत्र
बुधभूषण हा संस्कृत काव्यग्रंथ 326 पानांचा आहे. त्यात 850 वर कविता आहेत. त्यापैकी 110 निवडक कवितांचा हा काव्यात्म अनुवाद आहे. त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. संभाजी महाराजांच्या काव्यात नैतिकशास्त्र, समाजशास्त्र यांचा सखोल विचार आहे. हे स्वर्णमय कळसा, तुझा रंग जाईल, मूळ तांब्याचा रंग पुन्हा आवरणी येईल, बाह्य रंग जनास भूल पडे, ते कुठे जाणे तुझे अंतरंग बापुडे? अशा शब्दांत काव्यात्म अनुवादाची भाषा आहे. त्यांच्या काव्यात लोकशाहीचे सूत्र दिसून येते. संभाजी महाराजांच्या या काव्यप्रतिभेचा अभ्यास म्हणावा तसा झालेला नाही. तो अशा माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे कवी शरद गोरे यांनी सांगितले.
(फोटो - कवी शरद गोरे)