आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नॉन सीटीएस’ धनादेश एक जानेवारीपासून होणार बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सुरक्षित व्यवहारांसाठी चेक्स ट्रंकेशन सिस्टिम (सीटीएस) सर्व बँकांना स्वीकारावेच लागणार आहे. बिगर ‘सीटीएस’ धनादेश 31 डिसेंबर 2014 पर्यंतच वापरता येतील. त्याचे टप्पेही रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. सध्या आठवड्यातून दोन वेळा (सोमवार व शुक्रवार) हे धनादेश स्वीकारण्यात येतात. एक नोव्हेंबरपासून फक्त सोमवारीच ते स्वीकारण्यात येतील. त्यानंतर 31 डिसेंबर त्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे ग्राहकांनी सीटीएस धनादेशांचा वापर करावा, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

सीटीएस प्रणाली आल्यानंतर येथील स्टेट बँक ऑफ इंडियातील क्लिअरिंग हाऊस बंद झाले. त्यामुळे नागरी सहकारी बँकांपुढे अडचणी आल्या. कारण सीटीएस प्रणालीची प्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही. नॅशनल पेमेंट कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)चे सदस्यत्व नाही. त्यामुळे मोठय़ा खासगी बँकांमार्फत त्यांनी या प्रणालीतून धनादेशांची वसुली सुरू केली. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होत आहे. पण रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना म्हणून नवीन प्रणाली स्वीकारावीच लागणार आहे.

का आणि कशासाठी?
पूर्वीच्या पद्धतीत क्लिअरिंगसाठी सर्व धनादेश बाहेर (क्लिअरिंगसाठी) घेऊन जात होते. बाहेर पडलेल्या अशा धनादेशांवर खाडाखोड करून अधिक रकमा काढल्या जायच्या. बाहेरच त्याची विल्हेवाट लावली जात होती. राष्ट्रीयीकृतसह सहकारी बँकांमध्ये अशा प्रकारची अफरातफर झाली. ती रोखण्यासाठी सीटीएस प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रणालीत बोगस धनादेश ओळखता येतात.

नवीन सीटीएस धनादेश असा आहे.
नव्या प्रणालीमुळे सहकारी बँकांमध्ये अजूनही गोंधळ सुरूच आहे. मोठय़ा बँकांमार्फत सहसदस्यत्व घेऊन या प्रणालीतून धनादेश पाठवतोय. पण ग्राहकांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास विलंब होत आहे. सिस्टिम सुरळित होईपर्यंत थोडासा गोंधळ होईल, असेच वाटते.’’ बसवराज बोडा, सरव्यवस्थापक, लक्ष्मी सहकारी बँक

सीटीएस प्रणाली अतिशय पारदर्शक असल्याने ग्राहकांनी धनादेशांचा उपयोग करताना काळजी घ्यावी. खाडाखोड न करता, घड्या न घालता ते हाताळावेत. असे धनादेश या प्रणालीतून सुलभपणे बाहेर पडतात. बँक ऑफ इंडियातून दररोज हजारपेक्षा अधिक धनादेश या प्रणालीतून पाठवतो.’’ सुरेश र्शीराम, मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया (सेवा शाखा)
1. सिक्युरिटी प्रेसकडून नवीन धनादेशांची छपाई करून घ्यावी लागते
3. धनादेशावर विशिष्ट ठिकाणी बँकेचा लोगो ‘वॉटरमार्क’ने दिसला पाहिजे
2. धनादेशाचा आकार ठरलेला आहे. त्यापेक्षा मोठा वा छोटा चालत नाही
4. धना-देशाच्या डावीकडील बाजूला प्रिंटरचे नाव व ‘सीटीएस 2010’ असावे

अशी होते धनादेशांवर प्रक्रिया
1. सर्व धनादेश एका यंत्रातून तपासले जातात, वॉटरमार्क पाहतात.
2. ‘वॉइड’ अशा शब्द दिसून आला की, तो धनादेश रद्दबातल ठरतो
3. तपासलेले धनादेश फोटोकॉपीच्या यंत्रातून बाहेर काढले जातात.
4. त्यानंतर संगणकावर आलेले धनादेशांचे फोटो मुंबईला जातात.

ग्राहकांनी घ्यावयाची काळजी
1. सीटीएस धनादेशांवर तारखेशिवाय इतर खाडाखोड चालत नाही
3. धनादेशांची घडी, चुरगाळण्याचे प्रकार टाळावेत. डागही नकोत
2. सुवाच्य हस्ताक्षरात (टाइप केले तर उत्तम) धनादेशावर लिहावे
4. धनादेश फाडताना तो पूर्ण आयताकारात यावा, ही काळजी घ्यावी
5. धनादेशाच्या पाठीमागे खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्यावा
‘एनपीसीआय’चे हे सदस्य बँक
सीटीएस प्रणालीवर काम करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पाेरेशन ऑफ इंडियाने 10 बँकांचे मंडळ स्थापन केले. त्यात बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सिटी बँक, एचडीएफसी, एचएसबीसी, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँकेचा समावेश आहे. या बँकांचे सदस्यत्व घेऊन सीटीसी प्रणालीत येते येते. काही बँका थेट रिझर्व्ह बँकेचे सदस्य आहेत. सहकारी बँका या मंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना सदस्य बँकांमार्फत सहसदस्यत्व घेऊन या प्रणालीचा लाभ घेता येतो.