आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रासायनिक ताडीची विक्री तेजीत; राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांचे होतेय दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘क्लोरल हायड्रेट’ हे विषारी द्रव्य मिसळून तयार करण्यात येणार्‍या रासायनिक ताडीचे घरगुती विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. ही ताडी आरोग्याला अपायकारक असून पिणार्‍या शौकिनांची गर्दी वाढतच आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अशी घरगुती केंद्रे फोफावत आहेत. तरुण पिढी ताडीच्या व्यसनात अडकत असून अशा अनधिकृत ताडी विक्रीवर पायबंद घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

सोलापूर शहरामध्ये हैदराबाद रोड, शांती चौक, लोकसेवा हायस्कूलसमोर, अशोक चौक, मोदी, मड्डी वस्ती, कन्ना चौक आदी सात ठिकाणी अधिकृत केंद्रातून ताडी विकत आहेत. या ठिकाणी 20 रुपये प्रती लिटर ताडी विक्री होत आहे. एका ताडी केंद्रात दररोज सुमारे बाराशे ते पंधराशे लिटर ताडी विक्री होते. सात केंद्रांमधून दररोज 8,400 ते 10,500 लिटर ताडी विक्री होते. यावरून ताडी पिणार्‍यांची संख्या किती हे लक्षात येते. शहरात अलीकडे अशी घरगुती ताडी विक्री वाढलेली आहे. अधिकृत केंद्रात 20 रुपये लिटर दराने विक्री होणारी ताडी घरगुती केंद्रात 12 रुपयास तांब्या भरून मिळते. त्यामुळे अशा ठिकाणी ताडी शौकिनांची गर्दी वाढत आहे. अधिकृत ताडी विक्री केंद्रापेक्षा घरगुती रासायनिक ताडीच्या विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

कारवाई केली जाईल
रासायनिक ताडी विक्री संबंधात कोणाचेही निवेदन आलेले नाही. आमच्या विभागामार्फत अनेक ठिकाणी कारवाई सुरू आहे. कोणी जर रासायनिक ताडी विकत असेल तर त्यांच्यावर काडक कारवाई करू. ’’ संध्याराणी देशमुख, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

लेखी तक्रारीची दखल नाही
पंधरा दिवसांपूर्वीच घरगुती ताडी संदर्भात उत्पादन शुल्क खाते आणि पोलिस आयुक्त यांना लेखी निवेदन दिले. ताडीच्या व्यसनामुळे तरुण पिढी बिघडत असून त्यांच्या जीवनात नैराश्य निर्माण होत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही. ’’ नरेश संगा, नागरिक विडी घरकुल

अधिकृत विक्रेत्यांचे नुकसान
ताडी विक्रीच्या अधिकृत केंद्रासाठी दरवर्षी सुमारे दोन कोटी रुपयांचे शुल्क भरूनसुद्धा नुकसान होत आहे. पण घरगुती व्यावसायामुळे नुकसान होते. ही ताडी पिण्यास अपायकारक आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांकडे तक्रार करून काही उपयोग झाला नाही.’’ अशोक पाटील, अधिकृत विक्रेते