आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजेक्शन मिळाले नाही; मुलाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- लवंग (ता. माळशिरस) येथील हर्षद राजू जाधव (वय एक वर्ष) शनिवारी शेतातील वस्तीवर आईसोबत उभा होता. तेव्हा घोणस सापाने हर्षदच्या पायाला चावा घेतला. तत्काळ त्याला अकलूजच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सर्पदंश प्रतिबंधक लस खासगी दवाखान्यात उपलब्ध नव्हती. तेव्हा अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात जाधव कुटुंबीय लसीसाठी गेले असता औषधे आहेत पण ती व्हीआयपींसाठी राखीव ठेवली आहेत, असे डॉ. भारत खंडागळे यांनी सांगितले. त्याप्रसंगी उपस्थित असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी राग आवरून हर्षदला खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले.
दरम्यान, सुमारे 10 तासांचा कालावधी लोटल्याने सर्व अंगात विष भिनले होते. मृत्यूशी लढा देणार्‍या हर्षदने गुरुवारी जगाचा निरोप घेतला. हर्षदच्या मृत्यूमुळे जाधवकुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.


शासकीय रुग्णालयात येणार्‍या सर्व रुग्णांवर तातडीने उपचार होणे गरजेचे असते. येथील डॉक्टर असा उद्धटपणा दाखवत असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आपण लवंग बालक मृत्यूप्रकरण गांभीर्याने घेतले आहे. ’’ विजयसिंह मोहिते, आमदार

अकलूज उपजिल्हा रुग्णालयात लसीची मागणी झाली तेव्हा 15 सर्पदंश प्रतिबंधक लसी उपलब्ध होत्या. मात्र त्या देण्यासाठी सक्षम डॉक्टर नसल्यामुळे हर्षद जाधव या बालकास वेळेत लस देता आली नाही. ’’ डॉ. किरण सास्तुरकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय-अकलूज

फक्त व्हीआयपींकरता लस असल्याची बतावणी
उपलब्ध औषधे व्हीआयपींसाठी राखून ठेवल्याचे सांगत अकलूज उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी साप चावलेल्या एक वर्षाच्या मुलास 23 नोव्हेंबर रोजी उपचारापासून वंचित ठेवले. नाइलाजाने खासगी दवाखान्यात उपचार घेताना त्याचा गुरुवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयाबाबत संताप व्यक्त होत आहे.

वर्दीची मानवता

हर्षदला रुग्णालयात आणले तेव्हा अकलूज पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे अन्य कामासाठी आले होते. डॉक्टर हर्षदकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. तेव्हा शिंदे यांनीही उपचाराची विनंती केली. डॉक्टरांनी इंजेक्शन देण्याचे नाकारले. तेव्हा शिंदे यांनी अनावर झालेला राग वर्दीमुळे आवरला. हर्षदला आपल्या गाडीतून दुसर्‍या दवाखान्यात पाठवले. तेथे उपचार खर्चाची हमीही दिली.