आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकामगार विद्यार्थी बनला संगीत शिक्षक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आपल्या नशिबी आलेले बालकामगाराचे जीवन स्वीकारत पडेल ते काम केले. गरिबीचे चटके सोसत शिक्षण ही सोनेरी संधी मानली. सोलापूरच्या सिद्राम विभुते या बालकामगार शाळेच्या विद्यार्थ्याचा अजोड इच्छाशक्तीच्या बळावर बालकामगार ते संगीत शिक्षक असा प्रवास सुरू आहे.

कलेचे बाळकडू आई-बाबा
आई शाण्ण्म्मा व वडील महादेव यांच्याकडून बहुरूपी कलेचे बाळकडू लहान असल्यापासून मिळाले होते. नकला करणे, अभिनय करणे असे अनेक प्रकार सिद्राम करायचे. त्यांच्या या कलेची भुरळ त्यांनी आपल्या आई-बाबांसोबतच्या अनेक रामायणाच्या कथेतून सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात नेली होती. त्यातून आपल्या मुलाच्या अंगी असलेले हे कलागुण वाढावेत म्हणून आई- वडिलांनी सिद्राम यांना नेहरू नगरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या बालकामगार शाळेत दाखल केले. तिथे त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली.

‘इतनी शक्तीने..’ दिली संधी
शाळेत जेव्हा प्रार्थना म्हणाली जायची त्यावेळी मधुर आवाजाच्या विभुतेची प्रार्थना सगळय़ांना ऐकावीशी वाटायची. त्यातून श्रवणीय प्रार्थना, भजन आणि कविता असे अनेक प्रकार विभुते सादर करायचे. त्यांच्या या सादरीकरणामुळे त्यांच्यात स्टेज डेरींगचे बळ आले . त्यांना पुढे येण्यासाठी संधी मिळाली.

गरिबीची खंत नाही
पाच बहिणी व पाच भाऊ अशी एकूण 10 भावंडे. सिद्राम दहावा. पूर्वी आम्ही लहान असताना त्यांच्या या कलेच्या अनिश्चित क्षेत्रामुळे रोजचे खायचे अन्नही मिळणे अवघड होते. अशा अवस्थेत माणसाने येणार्‍या संकटांना कसे सामोरे जावे, हे सिद्राम यांना शिकता आले. गरिबीचे दु:ख कधी केले नाही आणि कधी आपण गरीब आहोत याची खंतही त्यांनी वाटू दिली नाही. त्यामुळेच पुढच्या काळात कठीण प्रसंगात शिक्षण घेऊन शिक्षक होणे शक्य झाले.

उभे केले स्वत:चे संगीतालय
सुयश गुरूकुल, नेहरू नगर येथील डी. एड. महाविद्यालय व सिध्देश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम केले. ते शिक्षण देताना आपलेही संगीतालय असावे असे वाटले. म्हणून नटराज संगीत विद्यालय सुरू केले. पुढे मुक्त विद्यापीठातून बी. ए. केले आणि आपल्या संगीत विशारद पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

संगीताकडे वळले असे
शिक्षण घेताना शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा चव्हाण यांनी मदत केली. शिक्षकांनी प्रत्येक गोष्टीत प्रेरणा दिली. संगीत शिक्षक संतोष कुलकर्णी, शर्वरी कुलकर्णी व हेरंबराज पाठक यांनी संगीताचे धडे दिले. त्या सगळय़ांच्या प्रोत्साहनाने संगीताचा प्रवास करणे शक्य झाले.

जीवन शोधण्याचा प्रयत्न
मी संगीताचा उपासक आहे आणि त्यातूनच आपले जीवन शोधण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला आहे.’’ सिध्देश्वर विभुते, संगीत शिक्षक, सोलापूर