आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मृत्यूनंतर मारले कुंपण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात बुधवारी दोन बालकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संस्थेचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आणि कंत्राटदार अनिल पंधे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसने केली. बालकांच्या मृत्यूस जबाबदार असल्यावरून पोलिस प्रशासनाने गुरुवारी उशिरा गुन्हा दाखल केला.

गोदूताई गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य कार्यालयामागे सेफ्टी टँकसाठी मोठा खड्डा खणलेला आहे. त्याभोवती सुरक्षाच नव्हती. अल्तमश पटेल आणि राकेश मादगुंडी ही सहा वर्षांची मुले मंगळवारी (ता. 25) दुपारी पावसात खेळता खेळता खड्डय़ात पडली. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबत वळसंग पोलिसांत नोंद झाली. परंतु मृतांच्या नातेवाइकांची कोणाविरुद्धही तक्रार नाही.

आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. गुरुवारी युवक काँग्रेसने ही मागणी केली. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेश प्रधान आणि निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन दिले. कार्यकर्त्यांनी वळसंग पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले. या वेळी महिला काँग्रेस शहराध्यक्षा सुमन जाधव, अंबादास करगुळे, नगरसेविका फिरदोस पटेल, अनिल पल्ली, गणेश डोंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मृत्यूला हवे असते केवळ निमित्त !
माकपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अल्लाबक्ष पटेल यांचा नातू अल्तमश याचा खड्डय़ात पडून मृत्यू झाला. गोदूताई संस्थेच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे. मुख्य कार्यालय उभारताना त्यांच्यावर आभाळ कोसळले. अल्तमशच्या मृत्यूबाबत ते म्हणतात, ‘‘मृत्यूला निमित्त हवे असते. त्या दिवशी पाऊस होता. त्याला जबाबदार धरायचे का?’’

घटनाच दुर्दैवी; पण तातडीची मदत दिली
घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यास संबंधित कंत्राटदार जबाबदार आहे. घटनेनंतर आम्ही स्वत: याबाबत पोलिसांना कळवले. दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत दिली. विद्यार्थी अपघाती योजनेतून पैसे मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत. ते मिळत नसतील तर संस्थेच्या वतीने मदत देऊ. दोषी असणार्‍यांवर कारवाई करायला हवी. काँग्रेस केवळ राजकारण करत आहे. महापालिकेच्या दूषित पाण्याने 2010 मध्ये 21 निरपराध नागरिकांचा जीव गेला. त्या वेळी कुठल्याच काँग्रेस नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी ‘ब्र’ शब्द काढला नाही. त्या वेळी माकपने महापौर, आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पुढे काय झाले, याचे उत्तर काँग्रेसवाले देतील काय?’’ नरसय्या आडम, माजी आमदार

आता मला कोण आहे.?
राकेशच्या आई-वडलांनी 2007 मध्ये जगाचा निरोप घेतला. मला नवर्‍याने सोडले. म्हणून सहा महिन्यांच्या राकेशलाच सर्वस्व मानले. मंगळवारी तो खेळता खेळता गडप झाला. शोध घेता घेता जीव कासावीस झाला. बुधवारची सकाळ उजाडली. राकेश गेलेला होता..’’ यमुनाबाई मादगुंडी, राकेशची आत्या

पंधे कन्स्ट्रक्शचा संबंध नाही
कार्यालयाचे बांधकाम पंधे कन्स्ट्रक्शनकडे नाही. त्यामुळे त्या खड्डय़ाशी आमचा संबंधच नाही. कार्यालयाची इमारत संस्था स्वत: बांधत असून, आम्ही फक्त त्याची देखरेख करतो. परंतु, त्यासंदर्भात संस्थेशी कुठलाच लिखित करार आम्ही केलेला नाही.’’ अमोल मेहता, मुख्य अभियंता, पंधे कन्स्ट्रक्शन