आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माणूस जन्मत: गुन्हेगार नसतो. गुन्हेगारांची मुले गुन्हेगारी क्षेत्रात येऊ नयेत. हातून चूक घडण्याआधीच हातात पाटी, पेन्सिल मिळाली तर त्यांच्या जीवनात शिक्षणाचा नवा प्रकाश येईल, कुटुंबात बदल घडेल. याच संकल्पनेतून तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘मिशन गरूड’ योजना पोलिस ठाणेनिहाय सुरू केली होती. आठ ते दहा मुलांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले. त्यानंतर वर्षभराने त्यांची बदली झाली अन् योजनाही मागे पडली.

2009 या शैक्षणिक वर्षात सदर बझार पोलिस ठाणे अंतर्गत दहा मुलांना एका संस्थेने दत्तक घेऊन वह्या, दप्तर, गणवेश यांचा खर्च उचलला. मुलांना शिक्षण प्रवाहात आणले होते. आठ दिवसांतून एकदा ती मुले पोलिस आयुक्तांना भेटत होती. सोलापुरात सात पोलिस ठाणी व गुन्हे शाखा तर जिल्ह्यात तीस पोलिस ठाणी आहेत. प्रत्येकी दोन विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणल्यास या उपक्रमाचा किमान 76 मुलांना लाभ मिळणे शक्य आहे.

2,500 मुलांना मिळेल शिक्षण
राज्यात एक हजार पोलिस ठाणे आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कक्षेत दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलला गेला तर 2000 व गुन्हे शाखांच्या माध्यमातून 500 असे एकूण 2,500 मुले शैक्षणिक प्रवाहात येतील. यासाठी सामाजिक संस्थांची मदत हवी. शासनानेही प्रत्येक पोलिस ठाण्याला विशेष निधी दिल्यास ही योजना यशस्वी होऊ शकते. गृहविभागाने ‘मिशन गरूड’ योजना सर्व पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त यांना लागू करण्याची सक्ती केल्यास व निधी दिल्यास शिक्षणाचा गंध नसलेला मुलांना ‘अ, ब, क, ड’ची गोडी लागेल. अक्षरातूनच ही मुले घडतील, भविष्यात मोठे अधिकारीही होऊ शकतील. पोलिस प्रशासनाची भूमिका आणि दानशूर व्यक्तींची साथ मोलाची ठरणार आहे.

मुलांमध्ये बदल घडतील
मिशन गरूड ही योजना चांगली आहे. विशेष आर्थिक तरतूद करावी. गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. मुलांना शिक्षण मिळाल्यास त्यांच्यात बदल घडेल. दानशूर व्यक्ती, अधिकारी यांनी यासाठी पुढे येण्याची गरज आहे. मी सोलापुरात असताना ही योजना सुरू होती. डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना विभाग, मुंबई